

पुणे : भारतीय विद्यार्थी संशोधन आणि एरोस्पेस नवोन्मेष क्षेत्रात ऐतिहासिक ठरणारी कामगिरी करत ‘एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी’ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भारतातील सर्वात मोठे रेडिओ-कंट्रोल्ड (आरसी) इलेक्ट्रिक फिक्स्ड-विंग विमान यशस्वीरीत्या डिझाईन, विकसित आणि उड्डाण केले आहे. ‘टीम स्कायट्रेक’ने विकसित केलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ‘प्रोजेक्ट गरुडा’ असे नाव देण्यात आले आहे.
‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड सायन्स अंतर्गत एरोस्पेस इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी हे विमान स्वतः विकसित केले असून, या प्रकल्पासाठी ‘सेंटर फॉर रिसर्च, इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप फॉर यंग ॲस्पिरंट्स’ मार्फत विद्यापीठाने अर्थसहाय्य केले आहे.
९.२५ मीटर विशाल विंगस्पॅनसह आणि २६१ किलो वजन असलेले हे विमान भारतात तयार झालेले सर्वात मोठे आणि सर्वाधिक वजनाचे रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमान ठरले आहे. या प्रकल्पासाठी ‘CRIEYA’कडून ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला.
या प्रकल्पाला ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कुलगुरू डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, प्र-कुलगुरू डॉ. मोहित दुबे, प्र-कुलगुरू , कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांचे सहकार्य लाभले. अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता डॉ. सुदर्शन सानप, एरोस्पेस विभागप्रमुख डॉ. कमलेश कुलकर्णी, डॉ. सुनील डिंगरे तसेच CRIEYAचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष दराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
‘गरुडा’ची वैशिष्ट्ये…
• भारतातील सर्वाधिक वजनाचे आरसी विमान - २६१ किलो
• भारतातील सर्वात मोठ्या विंगस्पॅनचे आरसी विमान - ९.२५ मीटर
• विमान संशोधन व उड्डाणासाठी ४८ लाख रुपयांचा खर्च
• टेक-ऑफसाठी आवश्यक अंतर - २०० मीटर
• उड्डाण क्षमता - १० मिनिटे
• कमाल उंची - १०० मीटर (एजीएल)
• पेलोड क्षमता - १०० किलोग्रॅम
• कमाल वेग - ८० किमी प्रतितास
• विंगस्पॅन - ९.२५ मीटर
• बॅटरी प्रकार - लि-पो २२० एएच बॅटरी
• बॅटरी व्होल्टेज - १०० व्होल्ट