
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील निवडणूक भाजपने मतांचा घोळ करून जिंकल्याच्या आरोपाचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी एकदा पुनरूच्चार केला. मतांमध्ये घोळ कसा केला जातो, याचे पुरावे हाती लागल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच याबाबत निवडणूक आयोगाकडे पुराव्यांसह सादरीकरण करणार असल्याचेही गांधी यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात एक कोटी नवीन मतदार दिसून आले. त्यांच्याद्वारे भाजपने मतांचा घोळ करून महाराष्ट्रातील निवडणूक जिंकली. कर्नाटकात आम्ही ही चोरी पकडली आहे. मी तुम्हाला, निवडणूक आयोगाला हे अगदी ‘ब्लॅक अँड व्हाईट’ रुपात स्पष्टपणे ही मतचोरी कशी होते ते दाखवून देऊ. आमच्या हातात पुरावे आहेत. त्यांनाही ते कळून चुकले आहे की ही चोरी आमच्या लक्षात आली आहे. कर्नाटक निवडणुकीतील अगदी ‘ब्लॅक अँड व्हाईट’ पुरावे आमच्या हातात आहेत, असेही विरोधी पक्षनेते म्हणाले.
सगळी चोरी पकडली
आम्ही लोकसभा मतदानावेळचा एक मतदारसंघ निवडला आणि त्यात खोलात जाऊन तपास केला. कारण अडचण अशी आहे की, हे लोक मतदार यादी कागदावर देतात आणि या यादीचे विश्लेषण केले जाऊ शकत नाही. मग एका मतदारसंघातील सर्व मतदार यादी आम्ही घेतली. त्याला डिजिटल फॉरमॅट करून घेतला. त्यात आम्हाला सहा महिने लागले. पण आम्ही आता यांची सगळी चोरी पकडली आहे. हे कसे केले जाते, कोण मतदान करते, कुठून मतदान होते, कसे नवीन मतदार बनवले जातात, हे सगळे आता आम्हाला कळले आहे, असेही ते म्हणाले.
निवडणूकच चोरली जात आहे
आता सरकारलाही ही गोष्ट कळून आली आहे. त्यामुळे आता ते बिहारमध्ये सर्व मतदान यंत्रणा नव्याने करण्याच्या मागे लागले आहेत. जुने मतदार डिलीट करून नव्या पद्धतीने मतदारांची नावे घेतली जात आहेत. नवीन मतदार यादी केली जात आहे. भारतात निवडणूकच चोरली जात आहे. हेच भारताचे वास्तव आहे, असेही ते म्हणाले.