
मुंबई : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोमवारी परभणीला जाणार आहेत. गांधी सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत.
सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून काही जणांना अटक करण्यात आली आहे. सूर्यवंशी यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.
परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत लोकांना मारहाण केली व लोकांवर गुन्हे दाखल करून अटक केली, असा आरोप होत आहे. या प्रकरणात शांतता प्रस्थापित करत असताना विजय वाकोडे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता, असेही सांगण्यात येते.
दौऱ्यात महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, रवींद्र चव्हाण, डॉ. कल्याण काळे, डॉ. शिवाजी काळगे, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश वरपुडकर, एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे आदी नेते उपस्थित राहणार आहेत.
असा असेल राहुल गांधी यांचा दौरा
राहुल गांधी सकाळी १२.३० वाजता राहुल गांधी यांचे विशेष विमानाने नांदेड येथे आगमन होईल, नांदेडहून ते मोटारीने परभणीला जातील. दुपारी २.१५ ते ३.१५ वाजता ते सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेतील व त्यानंतर विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत. या दोन कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी नांदेडकडे प्रयाण करतील व संध्याकाळी ५.१५ वाजता विमानाने दिल्लीला जातील.
संविधानाचा खरा विरोधी चेहरा काँग्रेसच - बावनकुळे
डॉ. आंबेडकर आणि संविधानाचा खरा राग हा काँग्रेसला आहे. राजकारणात आंबेडकरांना काहीच करता येऊ नये, यासाठी काँग्रेसने षडयंत्र रचले. डॉ. आंबेडकरांना सभागृहात कसे येऊ द्यायचे नाही, याची तयारी सुद्धा काँग्रेसने केली होती. बाबासाहेबांचे संविधान तोडण्याचे काम काँग्रेसने केले. त्यामुळे राहुल गांधींचा परभणी दौरा हा नौटंकी आहे. त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीची नौटंकी न करता समाजाला न्याय देण्यासाठी काम केले पाहिजे, असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला आहे.