राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला सशर्त परवानगी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या २२ ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी अखेर सशर्त परवानगी दिली आहे. पुण्यातील एस.एस.पी.एम. मैदानावर होणाऱ्या या सभेसाठी पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव तब्बल ३० कडक अटी लागू केल्या आहेत.
राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला सशर्त परवानगी
Published on

पुणे : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या २२ ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी अखेर सशर्त परवानगी दिली आहे. पुण्यातील एस.एस.पी.एम. मैदानावर होणाऱ्या या सभेसाठी पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव तब्बल ३० कडक अटी लागू केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाच्या परवानगीवरून काँग्रेस आणि पुणे पोलिसांमध्ये निर्माण झालेला वाद या निर्णयामुळे तूर्त निवळला असून काँग्रेस कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी सभास्थळी ड्रोन कॅमेऱ्यांच्या वापरावर पूर्ण बंदी घातली आहे. तसेच व्यासपीठासमोरील डी-झोनमध्ये बॅरिकेडिंग करणे, मर्यादित प्रवेश देणे आणि अग्निशमन दलासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमाणपत्र घेणे आयोजकांसाठी अनिवार्य केले आहे. महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था आणि केवळ महिला कर्मचाऱ्यांमार्फत तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वारे, आपत्कालीन मार्ग आणि पार्किंगची व्यवस्था करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. शांतता भंग झाल्यास किंवा अटींचे उल्लंघन केल्यास थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी हे सुमारे ८ ते १० हजार विद्यार्थिनींशी थेट संवाद साधणार आहेत. स्त्री शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात ‘मुली बोलतील, देश ऐकेल’ या संकल्पनेतून या विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी पेपरफुटी, शिक्षणाचा वाढता खर्च, विद्यार्थ्यांचे अधिकार, रोजगार आणि महिला सुरक्षा यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर विद्यार्थिनी राहुल गांधींना थेट प्रश्न विचारू शकणार आहेत. राजस्थानमधील कोटा येथून सुरू झालेल्या या अभियानाद्वारे विद्यार्थ्यांचे प्रश्न राष्ट्रीय पातळीवर आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

पुण्यात दिनांक २२ ऑगस्ट रोजी ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम घेणार असल्याचे काँग्रेसने आधीच जाहीर केले होते, मात्र ऐनवेळीही पोलिसांकडून परवानगी मिळत नसल्याने काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तर अत्यंत आक्रमक भूमिका घेत, पोलिसांची परवानगी मिळो अथवा न मिळो, हा कार्यक्रम पुण्यात होणारच, असा निर्धार व्यक्त केला होता.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in