

पुणे : 'महिला ही या देशाची सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे महिला कधीच स्वतंत्र होऊ नयेत हा मनुस्मृतीचा डाव आहे', असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुण्यात केला. तुम्ही स्वतःशिवाय कोणालाही बांधील नाही. महिलांनी सगळ्याच क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मात्र तरीही त्यांना विशिष्ट चौकटीत बसवले जात असल्याची खंत राहुल यांनी पुण्यामध्ये आयोजित' छात्रों की गूंज' कार्यक्रमात व्यक्त केली. या कार्यक्रमात राहुल यांनी तरुण पिढीशी, विशेषतः जेन-झी आणि हजारो तरुणींशी मनमोकळा संवाद साधला. दरम्यान, या कार्यक्रमासाठी काँग्रेसने पैसे देऊन माणसे जमविल्याचा आरोप
भाजपतर्फे करण्यात आला होता. या संवादादरम्यान राहुल गांधी यांनी महिलांच्या स्वातंत्र्यावर आणि त्यांच्या अस्तित्वावर अधिक सविस्तर प्रकाश टाकला. मनुस्मृतीने महिलांना केवळ तीन विशिष्ट चौकटींमध्ये बांधून ठेवले असल्याचा दावा त्यांनी केला. मुलीचे अस्तित्व केवळ कोणाची तरी मुलगी, पत्नी किंवा आई इतकेच मर्यादित असू शकत नाही आणि ही केवळ त्यांची एकमेव ओळख नाही, असे त्यांनी आग्रहाने सांगितले. सद्यस्थितीत महिलांना केवळ हिंसा आणि त्यांच्याबद्दल दाखवल्या जाणाऱ्या अनादराच्या माध्यमातून नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो, अशी खंतही त्यांनी या वेळी बोलून दाखवली. या सामाजिक चौकटी आणि बंधने तोडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
महिला सुरक्षेच्या भीषण परिस्थितीबाबत चिंता
देशातील महिलांच्या सुरक्षेच्या भीषण परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना राहुल गांधी यांनी काही धक्कादायक आकडेवारी सभागृहासमोर मांडली. भारतात दरवर्षी सुमारे साडेचार लाख मुलींची जन्माच्या आधीच गर्भात हत्या केली जाते, असा गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला. तसेच, देशातील तब्बल ८० टक्के महिलांना कोणत्या ना कोणत्या छळाचा सामना करावा लागतो आणि ३० टक्के महिलांचा शारीरिक छळ होतो, अशी आकडेवारी त्यांनी दिली. देशात दर १०० महिलांपैकी ६ महिलांवर अत्याचार होत असून, केवळ सुरक्षेच्या अभावामुळे अनेक हुशार मुलींना आपले शिक्षण किंवा नोकरी अर्धवट सोडून द्यावी लागते, असे ते म्हणाले. याशिवाय, शिक्षण क्षेत्रातही आजही मुलींसोबत मोठ्या प्रमाणावर भेदभाव केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
'बंधनांचा पिंजरा तोडणे' हीच काँग्रेसची संकल्पना
भारताच्या खऱ्या ताकदीचा उल्लेख करताना राहुल गांधी यांनी सांगितले की, जेव्हा लोक त्यांना देशाच्या ताकदीविषयी विचारतात, तेव्हा त्यांचे स्पष्ट उत्तर असते की, देशातील ७० कोटी महिला हीच भारताची खरी आणि सर्वात मोठी ताकद आहे. या अफाट महिलाशक्तीला योग्य वाव मिळणे गरजेचे असून, तरुण पिढी आणि तिची क्षमता ही भारताची मोठी ऊर्जा आहे. काँग्रेस पक्षाचे तरुणींच्या भविष्याबद्दलचे व्हिजन स्पष्ट करताना ते म्हणाले की, 'तुमच्याभोवती असलेला बंधनांचा पिंजरा तोडणे' हीच काँग्रेसची मुख्य संकल्पना आणि उद्दिष्ट आहे.
महिलांविरोधात तीन हिंसा
महिलांविरोधात तीन प्रकारची हिंसा केली जाते. एक थेट हिंसा. जन्माआधीच मुलींची हत्या होते, ही पहिली हिंसा. त्यानंतर जिथे तिथे होणारी छळवणूक. ८० टक्के महिलांना कोणत्या ना कोणत्या छळाचा सामना करावा लागतो. देशात १०० पैकी ६ महिलांवर बलात्कार होतो. ५० टक्के महिला सुरक्षेकरिता एज्युकेशन किंवा नोकरी सोडतात. याशिवाय आर्थिक हिंसा नावाचाही प्रकार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांनी मुलींच्या अनेक समस्या समजून घेतल्या. पालघरच्या एका मुलीने शाळकरी वयातील छेडछाड, त्याबाबत केलेली पोलीस तक्रार, त्यानंतर गावाने पुढे न शिकवण्याचा दिलेला सल्ला, तरीही वडिलांनी पुण्यात शिकवायला पाठवण्याचा घेतलेला निर्णय, तिथेही आलेले वाईट अनुभव व त्याचा केलेला प्रतिकार थोडक्यात मांडला.
शिव्या दिल्या, तरी सुधारणार नाही...
लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही का? महिलेने आवाज उठवला, तर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात, अशी व्यथा एका भोजपुरी महिलेने मांडली. ते मला शिव्या देतात, पण मी सुधारणार नाही, असे तिने सांगताच मलाही शिव्या देतात. मीही सुधारणार नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 'औरत पे जोर दिखावे, ये कैसा मर्दाना...', या गाण्यातून या महिलेने व्यवस्थेवर कोरडेही ओढले.
आश्रमशाळेतील मुलींच्या प्रश्नावर उपोषणाला बसण्याचा इशारा
मांजरीत राहणाऱ्या आदिवासी समाजातील मुलीने आपले प्रश्न मांडत विविध मागण्यांसाठी आपले कुटुंबीय उपोषण करत असल्याचे राहुल गांधी यांना सांगितले. मात्र, आदिवासी विकासमंत्र्यांना आदिवासी विद्यार्थिनींचे प्रश्न ऐकण्यासाठी वेळ नाही. वसतिगृहाची अट १३ वर्षापर्यंतची असून, ती वाढवली जावी तसेच सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींना १ कोटीची मदत मिळावी, अशा मागण्या या विद्यार्थिनीने केल्या. त्यावर आपण मिळून दबाव बनवू, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
विद्यार्थिनींची प्रचंड गर्दी
'छात्रो की गूंज' या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे परिसरात 'जेन झी' पिढी मोठ्या प्रमाणात एकवटल्याचे दिसून आले. विशेषतः या कार्यक्रमात स्त्री शक्तीचे दर्शन घडले. विद्यार्थिनींनी मनमोकळेपणाने पण रोखठोकपणे आपल्या भूमिका मांडल्याचे दिसून आले.
राजकीय भाषणाऐवजी विद्याथ्यांशी जिवंत संवाद
पुण्यातील या बहुचर्चित 'छात्रों की गुंज' कार्यक्रमासाठी काँग्रेसकडून गेल्या अनेक दिवसांपासून मोठी तयारी सुरू होती आणि अनेक ज्येष्ठ नेते पुण्यात ठाण मांडून बसले होते. या कार्यक्रमात हजारो तरुणी आणि महिलांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांनी आपल्या संवादाची सुरुवात करतानाच 'आज आपण राजकारणावर बोलणार नाही' असे स्पष्ट केले होते. त्यांनी राजकीय भाषणाऐवजी विद्यार्थ्यांशी थेट, दिलखुलास आणि जिवंत संवाद साधण्याला प्राधान्य दिले, जे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. यावेळी शिक्षण, तरुणांचे भविष्य, समाजातील विविध बदल, आधुनिक पिढीसमोरील आव्हाने आणि 'आदर्श नारी' संकल्पनेबद्दल बदलता दृष्टिकोन यांसारख्या अनेक विषयांवर विद्यार्थ्यांकडून आलेल्या प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.
मुलांनी शिव्या दिलेल्या कशा चालतात
लडकियों के गालीसे मुझे कल्चरल शॉक लगा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर बोलताना मुलांनी शिव्या दिल्या, तर चालतात, पण, मुलींनी नाही, यातून त्यांचा दृष्टीकोनच दिसतो. ८० टक्के बलात्कार महिलांमुळेच होतात, असेही ही मंडळी म्हणतात. खरेतर मुली देशाचा पाया आणि भविष्य आहेत. आपल्या सर्वांना मिळून ही मानसिकता संपवायची आहे, असा निर्धार राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
हा कार्यक्रम म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट फडणवीस
'राहुल गांधींचे कार्यक्रम म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट' असून, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच वाद निर्माण करून त्याची प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राहुल गांधी यांच्या 'छात्रों की गुंज' कार्यक्रमासाठी विद्यार्थिनींच्या सहभागाचा मुद्दा पुढे केला तरी प्रत्यक्षात कार्यक्रमाचे नियोजन आणि प्रसिद्धी यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयांतील विद्यार्थिनींनाच मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमात आणण्याचा प्रयत्न झाला, असा दावा त्यांनी केला. काही प्रभावकांना बोलावून काँग्रेसच्या कार्यक्रमाबाबत सकारात्मक प्रसिद्धी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.