

पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध पुण्यातील विशेष एमपी-एमएलए न्यायालयात सुरू असलेल्या फौजदारी बदनामी खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार हे फिर्यादी सात्यकी सावरकर यांचा उलटतपास घेत आहेत. फिर्यादीच्या वतीने ॲड. संग्राम कोलटकर काम पाहत आहेत.
मागील उलटतपासादरम्यान महात्मा गांधी यांच्या हत्येची पार्श्वभूमी, नथुराम गोडसे व गोपाळ गोडसे यांची भूमिका तसेच गोपाळ गोडसे आणि त्यांच्या पत्नी सिंधू गोडसे यांच्या मुलाखतींबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. बचाव पक्षाच्या म्हणण्यानुसार, सात्यकी सावरकर यांनी गोपाळ गोडसे यांच्या तीन मुलाखतींचे व्हिडीओ त्यांच्या आजोबांच्या मुलाखती असल्याचे मान्य केले.