
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांच्या आईच्या वंशावळीची मागणी करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका पुण्यातील एका न्यायालयाने फेटाळली आहे.
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात लंडनमध्ये भाषण करताना केलेल्या कथित अवमानकारक उल्लेखांवरून त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल झालेला आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, गांधी यांच्यावतीने याचिकाकार सावरकर यांच्या आईची वंशावळ मागण्यात आली होती.
न्यायदंडाधिकारी (प्रथण श्रेणी) अमोल शिंदे यांनी सांगितले की, हे प्रकरण कथित आक्षेपार्ह भाषणाशी संबंधित आहे, हिमानी सावरकर यांच्या वंशावळीशी संबधित नाही. हिमानी सावरकर ह्या महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचा धाकटा भाऊ गोपाळ गोडसे याच्या कन्या होत्या.
राहुल गांधी यांच्या वतीने युक्तिवाद करताना मिलिंद पवार यांनी सांगितले की, तक्रारदाराने आपल्या पितृपक्षाकडील वंशावळीची माहिती दिली आहे. मात्र मातृपक्षाकडील वंशावळीची माहिती दिलेली नाही. ही वंशावळ सुनावणीमध्ये आवश्यक आहे. मात्र कोर्टाने हा युक्तिवाद फेटाळून लावला.