संघाच्या बालेकिल्ल्यातून राहुल गांधींचा 'है तैयार हम' म्हणत हल्लाबोल; म्हणाले, "ही लढाई दोन विचारधारांमधील"

"हमने नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोली", असं म्हणत तुम्हाला या एका ओळीवरुन काँग्रेसची विचारधारा समजेल. "अगर आप नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलना चाहते हो, तो आप काँग्रेसी हो", असे म्हणत त्यांनी काँग्रेसच्या विचारधारेचा अर्थ सांगितला.
संघाच्या बालेकिल्ल्यातून राहुल गांधींचा 'है तैयार हम' म्हणत हल्लाबोल; म्हणाले, "ही लढाई दोन विचारधारांमधील"

काँग्रेसने पक्षाच्या 139 व्या वर्धापनदिनानिमित्त नागपूर येथे 'है तैयार हम' या टॅगलाईन खाली भव्य सभा घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपसह संघावर जोरदार हल्लाबोल केला. "ही दोन विचारधारांची लढाई आहे. भाजप देशाला गुलामीकडे घेऊन जात आहे. आमची लढाई महाष्ट्रातून सुरु झाली होती. ही काँग्रेसची जमीन आहे. त्यामुळे आम्ही नागपुरात आलो आहोत. आपण सर्व मिळून महाराष्ट्र आणि हिंदुस्थानात निवडणुका जिंकायला जात आहोत", असा निर्धार त्यांनी केला. या सभेला राहुल गांधींसह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कन्हैया कुमार तसेच महाराष्ट्रातील काँग्रेसचे बड्या नेते उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी एक भाजप खासदार मला भेटला. आधी बरेच भाजप खासदार काँग्रेसमध्ये होते. हा देखील त्यातलाच एक. तो मला चोरुन म्हणाला, राहुलजी मला तुमच्याशी बोलायचे आहे. मी त्याला म्हटले सर्व ठिक आहे ना? त्यावर त्याने नाही असे उत्तर दिले. तो म्हणाला, भाजपात राहुन सहन नाही केले जात. मी भाजपात आहे, पण माझे मन काँग्रेसमध्ये आहे. मी त्याला म्हणालो, मन तुझे काँग्रेसमध्ये आहे आणि शरीर भाजपात, याचा अर्थ तुझे मन शरीराला काँग्रेसमध्ये आणायला भीत आहे. यानंतर मी त्याला तिथे तुझे मन का लागत नाही असा प्रश्न विचारला. त्यावर त्याने, भाजपात गुलामी चालत असल्याचे सांगितले. जे वरुन सांगितलं जाते ते करावे लागते. आमचे कोणी ऐकत नाही. वरुन आदेश आले ते ऐकावे लागते, असे तो म्हणाला.

मोदींना प्रश्न आवडला नाही अन् पटोले आऊट झाले

भाजपच्या एकाधिकारशाहीविषयी बोलताना त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचं उदाहरण दिलं. पटोले यांनी पंतप्रधानांना, आपण लावलेल्या जीएसटीत शेतकऱ्यांचा वाटा किती असणार असा प्रश्न विचारला. मोदींना प्रश्न आवडला नाही, पटोले आऊट झाले. असं ते म्हणाले. यांची(भाजपा) विचारधारा राजेशाही विचारधारा आहे. काँग्रेस पक्षात लहानातील लहान कार्यकर्ता आमच्या कोणत्याही नेत्याला प्रश्न करु शकतो. मला देखील अनेक कार्यकर्ते येऊन "हे आम्हाला पटलं नाही", असं म्हणतात. मी त्यांना त्या बद्दल समजावून सांगतो. मी त्यांच्याशी सहमत नसलो तर, त्यांना तसं स्पष्ट सांगतो. पण, त्यांचं म्हणणं ऐकूण घेतो, असं राहुल यांनी सांगितलं.

स्वांतंत्र्यापूर्वी इथं इंग्रजांचं आणि राजांचं राज्य होतं. इथं पाचशे पेक्षा जास्त राजे होते. राजाला एखाद्याची जमीन आवडली तर, ती हिसकावून घेतली जात असे. आता सर्वांच्या अधिकारांचे संरक्षण संविधान करतं. हे नेहरु, आंबेडकर यांनी दिलं. हे लागू करण्याचं काम काँग्रेसने केले. आरएसएसचे लोक याविरोधात होते, आता येतात आणि रुबाबात झेंड्याला सलामी ठोकतात. देशाचा लगाम हिंदुस्थानच्या जनतेच्या हातात असायला हवा अशी आमची विचारधारा मानते. आम्ही जनशक्ती, लोकशक्तीची गोष्ट करतो. तुम्ही आमचे सर्व कायदे बघू शकतात. स्वातंत्र्याची लढाई देशाच्या जनतेने लढली, राजा महाराजांनी नाही. स्वातंत्र्याची लढाई फक्त इंग्रजांविरोधात नाही, तर राजा महाराजांविरोधात देखील होती. राजा महाराजांची इंग्रजांशी भागीदारी होती, असंही ते म्हणाले.

काँग्रेसने फक्त मदत केली

आपल्याला देशाच्या जनतेला देशाची शक्ती द्यायची आहे. लोक म्हणतात काँग्रेसने श्वेत क्रांती केली. आम्ही श्वेत क्रांतीला मदत केली. श्वेत क्रांती ही हिंदुस्थानातील महिलांनी केली. शेतकऱ्यांनी हरित क्रांती केली. आयटी क्षेत्रातील क्रांती देशाातील युवकांनी केली. काँग्रेसने फक्त मदत केली, असं राहुल यांनी म्हटलं.

सरकारने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं

काही दिवसांपूर्वी मला काही युवक भेटले. त्यांनी मला अग्निवीर योजनेअगोदर त्यांना सैन्यात घेतल्याचं सांगितलं. दीड लाख तरुणांना सैन्यात घेण्यात आले होते. त्यांची पात्रता देखील पूर्ण झाली होती. मोदींजींनी अग्निवीर योजना लागू केली आणि या दीड लाख तरुणांना सैन्यात येऊ नाही दिलं. ते तरुण माझ्यासमोर रडत होते. सरकारने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केले. गावात आम्हाला खोटे सैनिक म्हटले जाते. मोदींनी त्यांना बाहेर फेकून दिले, अग्निवीर योजनेत देखील येऊ दिले नाही, आणि हे स्वत:ला देशभक्त म्हणतात, असा निशाणा त्यांनी पंतप्रधानांवर साधला.

...तर देशात जातीनिहाय जनगणना करु

देशात ओबीसींची संख्या 50 टक्के, दलितांची 15 आणि आदिवासींची 12 टक्के आहे, आणि देशात 90 पैकी फक्त तीन अधिकारी ओबीसी आहे. त्यांना देखील कुठेतरी कोपऱ्यात बसवलं जातं. हिंदुस्थानच्या शे-दोनशे मोठ्या कंपन्यांची यादी काढा. त्यात मला दाखवून द्या, किती ओबीसी, दलित, आदिवासी कोणत्या स्थानावर आहेत. प्रत्येक क्षेत्रात ही स्थिती आहे. त्यामुळे मी देशात जातीनिहाय जनगणनेची मागणी केली. प्रत्येकाला कळले पाहिजे, कोणाची किती संख्या आहे. आमचं सरकार येताच आम्ही जातीनिहाय जनगणना करु, असे आश्वासनही राहुल यांनी यावेळी दिले.

"हमने नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोली", असं म्हणत तुम्हाला या एका ओळीवरुन काँग्रेसची विचारधारा समजेल. "अगर आप नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलना चाहते हो, तो आप काँग्रेसी हो", असे म्हणत त्यांनी काँग्रेसच्या विचारधारेचा अर्थ सांगितला.

logo
marathi.freepressjournal.in