मोदींनी घटना वाचलेलीच नाही म्हणून त्यांना ‘ती’ प्रत कोरी वाटते! राहुल गांधी यांचा आरोप

Maharashtra assembly elections 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटना वाचलेलीच नसल्याने आपल्या हातामधील ते लाल पुस्तक त्यांना कोरे आहे असे वाटते, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे केली. आदिवासी, दलित आणि इतर मागासवर्गाला निर्णय प्रक्रियेत समाविष्ट करून घ्यावयाची काँग्रेसची इच्छा आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राहुल गांधी
राहुल गांधीएक्स
Published on

नंदूरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटना वाचलेलीच नसल्याने आपल्या हातामधील ते लाल पुस्तक त्यांना कोरे आहे असे वाटते, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे केली. आदिवासी, दलित आणि इतर मागासवर्गाला निर्णय प्रक्रियेत समाविष्ट करून घ्यावयाची काँग्रेसची इच्छा आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे घटनेची छोटी प्रत असलेले लाल पुस्तक प्रत्येक सभेच्या ठिकाणी दाखवत आहेत. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गांधी यांच्यावर सातत्याने टीका करीत असतानाच गुरुवारी नंदूरबारमध्ये झालेल्या निवडणूक प्रचारसभेत गांधी यांनी त्यावरूनच मोदी यांच्यावर हल्ला चढविला.

नंदूरबारमध्ये झालेल्या प्रचारसभेत गांधी पुढे म्हणाले की, घटनेमध्ये देशाचा आत्मा आणि बिरसा मुंडा, गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या तत्त्वांचा समावेश आहे. भाजपला त्याच्या लाल रंगाबद्दल आक्षेप आहे, परंतु रंग कोणताही असो, घटनेचे जतन करण्यास आम्ही बांधील असून त्यासाठी प्रसंगी प्राणाची आहुती देण्यासही तयार आहोत. मोदी यांनी घटना वाचलेलीच नाही. त्यामुळे त्यांना घटना (पु्स्तक) कोरी दिसते, असे गांधी म्हणाले. भाजपने आपल्या प्रचारात लाल पुस्तकाचा संबंध शहरी नक्षलवादाशी जोडला आहे.

महिलांना दरमहा तीन हजार रुपये आणि बसने मोफत प्रवास, शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंतचे कर्ज माफ आणि बेरोजगार युवकांना दरमहा चार हजार रुपयांचे सहाय्य यांचा महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात समावेश केला आहे, असे ते म्हणाले. यावेळी जातनिहाय जनगणनेचाही गांधी यांनी उल्लेख केला. जातनिहाय जनगणना केल्यास राज्यातील आदिवासी, दलित आणि ओबीसींची संख्या निश्चित होण्यात मदत होईल, असेही गांधी म्हणाले.

प्रकल्प परराज्यात

राज्यात येणारे प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आल्याच्या मुद्द्यावरूनही गांधी यांनी टीका केली. महाराष्ट्रासाठीचे प्रकल्प गुजरातला नेण्यात आल्याने पाच लाख रोजगार बुडाल्याचे ते म्हणाले. आमचे सरकार हे होऊ देणार नाही, जे प्रकल्प महाराष्ट्रासाठी आहेत ते येथेच राहतील आणि जे गुजरातसाठी आहेत ते तेथेच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

घटनेत गरीब-श्रीमंत भेदभाव नाही

दरम्यान, नांदेड येथील सभेत गांधी म्हणाले की, मोदी यांनी घटना वाचली असती तर निराळी धोरणे राबविली असती. गरीब आणि श्रीमंत यांच्यात भेदभाव करण्याची शिकवण घटना देत नाही. २५ धनिकांचे १६ लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले, परंतु गरीब आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले नाही. घटना याची शिकवण देत नाही, असे गांधी म्हणाले. यावेळी गांधी यांनी मणिपूरमधील स्थितीचा उल्लेख केला. एक वर्षाहून अधिक काळापासून मणिपूर धुमसत असताना पंतप्रधान मोदी तेथे फिरकलेच नाहीत, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in