पुणे : शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर रोजी सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, मोहनराव कदम नगर वांगी येथील स्मृतिस्थळावर सकाळी ११ वाजता राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकतीर्थ या स्मारकाचे लोकार्पण लोकसभेतील विरोधी पक्षनेते व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्याला माजी केंद्रीय कृषी व संरक्षण मंत्री शरदचंद्र पवार, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, विधीमंडळ काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.
डॉ. विश्वजीत कदम पुढे म्हणाले ‘गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन’ या ध्येयाने प्रेरित होऊन डॉ. पतंगराव कदम यांनी केलेली भारती विद्यापीठाची निर्मिती हे समाजाला वरदान ठरलेले आणि साहेबांचे सत्यात उतरलेले एक मोठे स्वप्न आहे. साहेबांची दूरदृष्टी, त्यांचे मार्गदर्शन, त्यांचा कामाचा विलक्षण झपाटा, त्यांनी भारती विद्यापीठात निर्माण केलेली कुटुंब भावना आणि प्रगतीच्या वाटचालीत सहभागी होण्याची सर्वांना दिलेली समान संधी यामुळे भारती विद्यापीठाची गेल्या ६० वर्षात देदिप्यमान वाटचाल झाली. आज भारती विद्यापीठाचे विद्यार्थी जगभर विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे बहरलेले कर्तृत्व हीच साहेबांच्या आणि भारती विद्यापीठाच्या कार्याची पावती आहे.
स्वातंत्र्यानंतर विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य जपत सर्वसमावेशक विकासाचे स्वप्न सत्यात उतरविणारे आदरणीय पंडीतजी नेहरु, इंदिराजी गांधी आणि राजीवजी गांधी यांच्या व काँग्रेस पक्षाच्या विचारांशी सदैव एकनिष्ठ राहिलेल्या साहेबांनी पक्षाची विचारधारा सर्वसामान्य लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी आयुष्यभर जीवाचे रान केले. केवळ मतदारसंघाचा विकास हेच उद्दिष्ट डोळयासमोर न ठेवता त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहिले. त्यासाठी अविरत परिश्रम घेतले.
सांगली जिल्ह्यातील सोनसळसारख्या छोट्याशा खेड्यात जन्माला आलेल्या या लोकनेत्याने केलेले काम अलौकिक आणि अव्दितीय असेच आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिस्थळावर त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती. या लोकभावनेचा आदर राखून डॉ.पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे सर्वांनी ठरविले. त्यातून भावी पिढ्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल, अशी भावना डॉ. कदम यांनी व्यक्त केली.
उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती
शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर रोजी ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकतीर्थ या स्मारकाचे लोकार्पण लोकसभेतील विरोधी पक्षनेते व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नावाचा समावेश नसल्यामुळे ते उपस्थित राहणार नाहीत.