राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ आज मुंबईत; शिवाजी पार्कच्या सभेत 'इंडिया' आघाडीचे बडे नेते उपस्थित राहणार

काँग्रेसच्या महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेत्यांनी शुक्रवारी ठाणे आणि मुंबईतील सभास्थळांची पाहणी करीत तयारीचा आढावा घेतला.
राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ आज मुंबईत; शिवाजी पार्कच्या सभेत 'इंडिया' आघाडीचे बडे नेते उपस्थित राहणार

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ शनिवारी संध्याकाळी मुंबईत दाखल होणार आहे. शनिवारी राहुल गांधी चैत्यभूमी येथे भेट देणार असून त्यानंतर या यात्रेची सांगता होणार आहे. यात्रेची एकीकडे सांगता होत असताना महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळही रविवारी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या इंडिया आघाडीच्या सभेत फोडण्यात येणार आहे.

या सभेसाठी काँग्रेसची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली असून या सभेला इंडिया आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, एम.के. स्टॅलिन उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या माध्यमातून महाराष्ट्रात वातावरणनिर्मिती करण्याचा आघाडीचा प्रयत्न राहणार आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’चा दुसरा टप्पा १४ जानेवारीपासून मणिपूर येथून सुरू झाला होता. त्यानंतर सोमवारी ही यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर आता या यात्रेची सांगता मुंबईत होत आहे. शुक्रवारी या यात्रेची सुरुवात सकाळी मोखाड्यातील हनुमान मंदिरापासून झाली. जव्हार येथील विजय स्तंभाला राहुल गांधी यांनी अभिवादन केले, वाडा येथे सभेला संबोधित केले. यात्रेचा आजचा मुक्काम सोनाळे मैदान येथे राहणार आहे. त्यानंतर शनिवारी दुपारच्या आसपास ही यात्रा मुंबईत दाखल होणार असून चैत्यभूमी येथे या यात्रेची सांगता होणार आहे.

काँग्रेसच्या महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेत्यांनी शुक्रवारी ठाणे आणि मुंबईतील सभास्थळांची पाहणी करीत तयारीचा आढावा घेतला. मुख्य म्हणजे, शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभेसाठी इंडिया आघाडीतील अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in