विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरच! औपचारिक घोषणा आज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू तसेच भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड होणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही रविवार दुपार १२ वाजेपर्यंत होती. या मुदतीत राहुल नार्वेकर यांनीएकमेव अर्ज दाखल केला आहे.
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरच! औपचारिक घोषणा आज
राहुल नार्वेकर, एक्स
Published on

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू तसेच भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड होणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही रविवार दुपार १२ वाजेपर्यंत होती. या मुदतीत राहुल नार्वेकर यांनीएकमेव अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांबाबतची औपचारिक घोषणा सोमवारी करण्यात येईल.

शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारच्या काळात विधानसभा अध्यक्षाची भूमिका बजावलेल्या राहुल नार्वेकर यांना यावेळी कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, पेशाने वकील असलेल्या नार्वेकर यांचे कौशल्य पाहता, त्यांना पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपद सांभाळण्यास सांगण्यात आले. महायुतीकडे बहुमताने संख्याबळ असल्याने राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदासाठी निवड ही केवळ औपचारिकता मानली जात आहे.

महायुतीत विधानसभा अध्यक्षपद हे भाजपकडेच राहणार असल्याने या पदासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे नाव आघाडीवर होते. याशिवाय ज्येष्ठ सदस्य म्हणून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र, रविवारी अंतिम मुदतीआधी राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. विरोधी पक्षाकडून एकही उमेदवारी अर्ज न आल्याने राहुल नार्वेकर यांची निवड बिनविरोधच झाली आहे. आता केवळ औपचारिकता बाकी असून त्याची घोषणा सोमवारी होईल.

कुलाबा मतदारसंघातून भाजपकडून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार राहुल नार्वेकर हे कायद्याचे पदवीधर आहेत. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळून महायुतीचे सरकार सत्तेवर आले. या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर जुलै २०२२ मध्ये विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली. नार्वेकर यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणांवर सुनावणी घेऊन निर्णय दिला होता. या निर्णयावरून त्यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई आहेत. त्यांचे वडील सुरेश नार्वेकर हे कुलाब्यातून नगरसेवक होते. तसेच त्यांचे भाऊ नगराध्यक्ष आणि वहिनी कफ परेडमधून भाजपच्या माजी नगरसेविका आहेत.

आठ आमदारांचा शपथविधी अजूनही बाकी

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आमदारांच्या शपथविधीसाठी शनिवारपासून तीन दिवस विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. शनिवारी महायुतीच्या बऱ्याच आमदारांनी शपथ घेतली, मात्र, महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार घातला होता. रविवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या उर्वरित ११४ पैकी १०६ आमदारांनी शपथ घेतली. मात्र उत्तमराव जानकर, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर, विनय कोरे, जयंत पाटील, शेखर निकम, सुनील शेळके हे आमदार शपथविधीला अनुपस्थित राहिले. आता या आमदारांना विधानसभा अध्यक्षांच्या दालनात शपथ देण्यात येईल.

logo
marathi.freepressjournal.in