सुनावणीवेळी ठाकरे गटाने माहिती का दिली नाही? राहुल नार्वेकर : माझा निर्णय न्यायालयाच्या आदेशानुसारच

या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांचे आरोप खोदून काढले.
सुनावणीवेळी ठाकरे गटाने माहिती का दिली नाही? राहुल नार्वेकर : माझा निर्णय न्यायालयाच्या आदेशानुसारच

प्रतिनिधी/मुंबई : शिवसेनेने सन २०१३ आणि २०१८ मध्ये झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीतील निर्णयाची माहिती भारत निवडणूक आयोगाला दिली आहे. या पत्रात फक्त संघटनात्मक निवडणुकीच्या निकालाची माहिती आहे. घटनादुरुस्तीचा अथवा कार्यकारिणीतील ठरावाचा कोणताही उल्लेख नाही, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी दिली. तसेच आमदार अपात्रता सुनावणीच्या वेळी माझ्यासमोर युक्तिवाद करताना ठाकरे गटाने २०१८ मध्ये झालेल्या घटनादुरुस्तीबाबत कोणतीही माहिती का दिली नाही, असा सवालही नार्वेकर यांनी केला.

राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेच्या संदर्भात निर्णय दिला. हा निर्णय देताना त्यांनी शिवसेना हा मूळ पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निवडा दिला. त्याचवेळी त्यांनी दोन्ही गटाची एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरविण्याची याचिका फेटाळून लावली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी वरळीत महापत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर आक्षेप घेतला. हा निर्णय असंवैधानिक असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला जनतेच्या न्यायालयात घेऊन जाणार असल्याचे घोषित केले.

या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांचे आरोप खोदून काढले. सर्वोच्च न्यायालयाने पक्षाची घटना, संघटनात्मक रचना आणि विधिमंडळातील बहुमत याआधारे आमदार अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यानुसार मी निवडणूक आयोगाला पत्र लिहून आयोगाकडे उपलब्ध असलेली शिवसेनेची प्रत मागवली. ही प्रत देताना आयोगाने १९९९ नंतर शिवसेनेच्या घटनादुरुस्तीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याची माहिती आयोगाने कळविल्याचे नार्वेकर म्हणाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून २०१३ आणि २०१८ च्या घटनादुरुस्तीचा आणि निवडणूक आयोगाला माहिती दिल्याचा दावा केला जातो. मात्र, प्रत्यक्षात या पत्रात राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मुख निवडणूक अधिकारी बाळकृष्ण जोशी यांनी संघटनामक निवडणूक निकालाची माहिती दिली आहे. या पत्रात कुठेही घटनादुरुस्ती आणि त्यासंदर्भात कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या ठरावाची माहिती दिलेली नाही, असे नार्वेकर यांनी सांगितले.

दरम्यान, शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून झालेली नियुक्ती कायमस्वरूपी चुकीची किंवा अजय चौधरी आणि सुनील प्रभू यांची नियुक्ती ही कायमस्वरूपी बरोबरची असे सर्वोच्च न्यायालयाने कुठेही सांगितले नव्हते. मात्र, मूळ पक्ष, पक्षाची संघटनात्मक रचना आणि विधिमंडळातील बहुमत लक्षात घेऊन त्या आधारे शिवसेना हा पक्ष शिंदे यांचा असल्याचा आणि भरत गोगावले हे मुख्य प्रतोद असल्याचा निवडा दिल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना योग्य रीतीने व्हिप पोहोचला नव्हता. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले नाही, असा खुलासाही त्यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in