

मुंबई : विधीमंडळाची उद्याची बैठक संपेपर्यंत लक्ष्यवेधीची प्रलंबित उत्तरे दिली नाहीत तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाईल, असा इशारा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. लोकप्रतिनिधी मांडलेल्या अनेक लक्ष्यवेधी सूचनांची उत्तरे अद्यापि देण्यात आलेली नाहीत, असा मुद्दा भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला होता.
माजी मंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवारांनी लक्ष्यवेधींच्या प्रलंबित मुद्द्यांचा प्रश्न सभागृहात मांडला. काही लक्ष्यवेधी या सभागृहात मांडल्या जातात तर काही लक्ष्यवेधींची उत्तरे ही शेवटच्या दिवशी सभागृहाच्या पटलावर ठेवली जातात, अशी प्रथा आहे. पण काही अधिवेशनापासून ही प्रथा दिसत नाही, असे मुनगंटीवारांनी निदर्शनास आणून दिले.
मुनगंटीवार म्हणाले की, 'विधानसभा अध्यक्षांनी या आधी ३० सप्टेंबर रोजी मुख्य सचिवांना एक पत्र लिहिले होते. त्यानुसार १२९ लक्ष्यवेधी सूचनांची निवेदने प्राप्त आहेत. ३२९ स्वीकृत लक्ष्यवेधींपैकी २९२ निवेदनं प्राप्त आहेत. उर्वरित लक्ष्यवेधींची उत्तरे दिली नाहीत.
मुनगंटीवार यांच्या मुद्द्यावर बोलताना विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले की, 'सुधीर मुनगंटीवारांनी मांडलेला मुद्दा अगदी योग्य आहे. कोणत्याही अधिकाऱ्याला जर वाटत असेल की विधीमंडळाच्या पीठासन अधिकाऱ्याने जर दिलेले निर्देश पाळणे बंधनकारक नाही, तर त्यावर कारवाई केली जाईल. उद्या सभागृहाची बैठक संपेपर्यंत जर सभागृहाच्या पटलावर प्रलंबित लक्ष्यवेधींची उत्तरं आली नाहीत तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाची कारवाई केली जाईल', असा इशारा त्यांनी दिला.