

मुंबई : पद्मविभूषण आशा भोसले यांच्या निधनानंतर विधानसभेत शोकप्रस्तावाचे वाचन करताना झालेल्या शब्दोच्चारातील चुकांवरून राज्यभर टीकेची झोड उठल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली. मराठी भाषेबद्दल आपल्याला प्रचंड अभिमान असून, शोकप्रस्तावाच्या वाचनावेळी झालेल्या चुका या केवळ तांत्रिक कारणांमुळे झाल्याचा खुलासा त्यांनी केला.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेच्या माजी दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राहुल नार्वेकर यांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहताना शोकप्रस्तावाच्या वाचनात असंख्य चुका केल्या. या चुकांबाबत नार्वेकर यांच्यावर समाज माध्यमातून टीका झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही नार्वेकर यांना त्यांच्या मराठी वाचनावरून फटकारले होते.
या पार्श्वभूमीवर आज सभागृहाचे कामकाज सुरु होताच नार्वेकर यांनी याबाबत खुलासा करत दिलगिरी व्यक्त केली. त्या दिवशी सभागृहात एकूण १२ शोकप्रस्तावांचे वाचन करायचे होते. माझ्या हातात आलेली प्रत अत्यंत बारीक आणि अस्पष्ट फॉन्टमध्ये होती. त्यात काही तांत्रिक त्रुटीही होत्या, ज्या सुरुवातीला लक्षात आल्या नव्हत्या. त्यामुळे वाचन करताना जशा चुका मजकुरात होत्या, त्याचप्रमाणे त्या माझ्याकडून वाचल्या गेल्या. हे एका चुकीमुळे घडले असून त्याचा कोणीही वेगळा अर्थ काढू नये, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
गेली साडेचार वर्षे विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करताना अनेक भाषणे, शोकप्रस्ताव आणि सभागृहाचे संपूर्ण कामकाज आपण मराठी भाषेतूनच हाताळले आहे. त्यामुळे या सभागृहातील प्रत्येक सदस्याला आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषेचा जितका अभिमान आहे, तेवढाच किंबहुना त्यापेक्षा अधिक अभिमान मला मराठी भाषेबद्दल आहे. आशा भोसले यांच्याबद्दल अवमान करण्याचा विचार कोणत्याही मराठी माणसाच्या मनात येऊ शकत नाही. विधानसभेच्या अध्यक्षपदावर असताना असा विचार तर मुळीच शक्य नाही. तरीही या घटनेमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो, असेही नार्वेकर म्हणाले.