छत्रपती संभाजीनगर : शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडीजवळील दगडगल्लीतील हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी छापा मारला. यात ३५ लिटर हातभट्टीच्या दारूसह ५५ हजार रुपये किमतीचे सहाशे लिटर रसायन व साहित्य जप्त केले. शंकर नारायण आचार्य (८३, रा. कुंभारवाडा, दगडगल्ली) असे आरोपीचे नाव आहे. शहरात गेल्या अनेक वर्षांपासून दगडगल्लीत हातभट्टीचा कारखाना छुप्या पद्धतीने सुरू होता. राज्य उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी या आगोदरही कारवाईचे प्रयत्न केले; मात्र, जास्त माल त्यांच्या हाती लागला नाही. थर्टीफस्टच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर रसायने आणण्यात आले होते. त्यापैकी ३५ लिटर दारूही तयार करण्यात आली होती. हा कारखाना जोमात सुरू होण्याअगोदरच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर. के. गुरव यांना या कारखान्याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी निरीक्षक आनंद चौधरी, दुय्यम निरीक्षक जी.बी. इंगळे, बी.आर. वाघमोडे, एस.बी. रोटे, प्रवीण पुरी, गणेश नागवे, बी. आर. पुरी आदींसह छापा मारला. या कारवाईत त्यांनी गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, रसायन, गावठी दारू असा मुद्देमाल जप्त केला.