पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार यांचे नातू आणि बारामती विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या ‘शरयू टोयोटा’मध्ये पैशांचे वाटप सुरू असल्याची तक्रार निवडणूक आयोगाला प्राप्त झाल्यानंतर सोमवारी रात्री तेथे तपासणी करण्यात आली. मात्र, या तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य आढळले नाही, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला अवघे काही तास उरलेले असतानाच ही तपासणी करण्यात आल्यामुळे उलटसुलट चर्चेला जोरदार उधाण आले आहे.
दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, शरयू टोयोटामध्ये पैशांचे वाटप सुरू असल्याची तक्रार आमच्याकडे आली होती, त्यानुसार आम्ही तपासणी केली असताना त्यामध्ये काहीही तथ्य आढळले नाही, असे ते म्हणाले.
पोलीस आणि पाच-सहा सरकारी अधिकारी आले होते, रात्री शोरूम बंद असते, पण ते आले आणि म्हणाले की तक्रार आली आहे. तक्रार कोणाकडून आली हे त्यांनी सांगितले नाही. शोरुममधील कर्मचाऱ्यांनी त्यांना आतमध्ये नेले, त्यांनी आतमध्ये तपासले, असता त्यांना काहीही सापडले नाही. निवडणुकीच्या काळात अशा गोष्टी घडत असतात, असे श्रीनिवास पवार म्हणाले.