पाताळगंगेत HPCL चे ३,००० गॅस सिलेंडर वाहून गेले; फुकटात टाक्या नेण्यासाठी नागरिकांची गर्दी, जिल्हाधिकाऱ्यांकडून महत्त्वाचं आवाहन

सिलेंडर वाहून गेल्याची बातमी पसरताच खाडीकिनारी स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली होती. काहींनी तर सिलेंडरसाठी चक्क छोट्या होड्या पाण्यात उतरवल्या.
X
पाताळगंगेत ३,००० गॅस सिलेंडर वाहून गेले; फुकटात टाक्या नेण्यासाठी नागरिकांची गर्दी, जिल्हाधिकाऱ्यांकडून महत्त्वाचं आवाहनव्हायरल व्हिडिओवरून घेतलेले स्क्रीनशॉट
Published on

नवी मुंबईः रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील चवणे येथील एचपीसीएलच्या एलपीजी बॉटलिंग प्लांटमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी शिरल्याने सुमारे ३,००० एलपीजी सिलिंडर (भरलेले आणि रिकामे दोन्ही) वाहून पाताळगंगा नदीत गेले आहेत. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पाताळगंगा नदीच्या काठावरील विविध गावांमध्ये हे सिलेंडर वाहून येण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली असून नदीत किंवा नदीकाठावर आढळणाऱ्या सिलेंडरना हात न लावण्याचे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नागरिकांना असे सिलेंडर आढळल्यास ते स्वतःजवळ ठेवू नयेत किंवा वापरण्याचा प्रयत्न करू नये. तात्काळ एचपीसीएल, जवळच्या एचपीसीएल डिलर, तहसीलदार कार्यालय (खालापूर/पेण) किंवा उपविभागीय अधिकारी, पेण यांच्या कार्यालयात जमा करावेत. नदीत वाहून आलेल्या सिलेंडरमध्ये गॅस आहे किंवा नाही अथवा ते सुरक्षित स्थितीत आहेत का, याबाबत खात्री नसते. त्यामुळे उत्सुकतेपोटी किंवा वापरासाठी असे सिलेंडर उचलणे, हलविणे, उघडणे किंवा घरी नेणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही जोखीम घेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

सिलेंडरसाठी पाण्यात उतरवल्या छोट्या बोटी

हजारो गॅस टाक्या हेलकावे खात धरमतर खाडीच्या दिशेने पुढे वाहून जात होत्या. सिलेंडर वाहून गेल्याची बातमी पसरताच खाडीकिनारी स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली होती. काहींनी तर सिलेंडरसाठी चक्क छोट्या होड्या पाण्यात उतरवल्या. पेण तालुक्यातील खारपाड्यापासून दादर गावापर्यंतच्या नागरिकांनी खाडीत चढाओढ केली होती. पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. दरम्यान, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सिलेंडर आढळल्यास त्याबाबत तातडीने महसूल विभाग, पोलीस किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in