रायगड : आनंदाच्या शिधाचा अद्याप पत्ताच नाही! जिन्नस न आल्याने वाटप रखडले

गोरगरीबांना गौरी-गणपतीचा सण आनंदात साजरा करता यावा, यासाठी राज्य शासनाने 'आनंदाचा शिधा' वाटप करण्याचे जाहीर केले होते. परंतु गणेशोत्सव संपुष्टात आला तरी आनंदाचा शिधा रायगड जिल्ह्यात पोहचलेलाच नाही.
रायगड : आनंदाच्या शिधाचा अद्याप पत्ताच नाही! जिन्नस न आल्याने वाटप रखडले
Published on

धनंजय कवठेकर/अलिबाग

गोरगरीबांना गौरी-गणपतीचा सण आनंदात साजरा करता यावा, यासाठी राज्य शासनाने 'आनंदाचा शिधा' वाटप करण्याचे जाहीर केले होते. परंतु गणेशोत्सव संपुष्टात आला तरी आनंदाचा शिधा रायगड जिल्ह्यात पोहचलेलाच नाही. काही ठिकाणी रवा आहे, साखर नाही, गोडतेल आहे तर चणाडाळ नाही. असा सावळागोंधळ जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे. लाभार्थी दुकानात फेऱ्या मारून वैतागले. वाटप करण्यासाठी शिधा आलेलाच नसल्याने रेशनदुकानदारही दुकाने बंद करून गणेशोत्सवात बिझी असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. मात्र यामुळे अल्पउत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना खूपच त्रास सहन करावा लागला, यामुळे गोरगरीब लाभार्थ्यांमध्ये सरकारच्या भोंगळ कारभाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

ज्यांचे उत्पन्न कमी आहे, अशी कुटुंबे 'आनंदाचा शिधा' कधी वाटप होणार याकडे डोळे लावून बसले होती. १०० रुपयात उपयोगी चार जिन्नस मिळणार आहेत. यामुळे काही प्रमाणात आर्थिक भार कमी होईल, असे या लोकांचे म्हणणे होते. परंतु तसे झालेच नाही. अखेर बाजारातून अधिक किमतीमध्ये जिन्नस विकत घ्यावा लागला. शासनामार्फत आनंदाचा शिधा यामध्ये रवा, चणाडाळ, गोडतेल, साखर या पदार्थांचा समावेश होता. शनिवारपर्यंत जिल्ह्यातील एकाही तालुक्यात आनंदाचा शिधा पोहोचलेला नसल्यामुळे दुकानदार अडचणीत सापडले हाते. सणाचे दिवस संपल्यानंतर आनंदाचा शिधा वाटपाची ही परंपरा रायगड जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून सुरू आहे.

सणाचे दिवस संपल्यानंतर लोक शिधा घेण्यासाठी जात नाहीत, त्यामुळे शिधा किटच्या वाटपाचे उद्दिष्ट्ये गाठता येत नाही. परिणामी जिल्ह्यात मागणी होणाऱ्या कीटची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. जिल्ह्यात लाभार्थी कार्डधारकांची एकूण संख्या ४ लाख ६३ हजार ६१० इतकी असताना एकूण ३ लाख ९६ हजार ९९१ इतक्याच लाभार्थ्यांसाठी आनंदाचा शिधा मंजूर झालेले आहे. हे एक षडयंत्र असल्याचे येथील लोकांचे म्हणणे येथील लोकांचे आहे. लाभार्थ्यापर्यंत धान्य किंवा त्यातील काही वस्तू न पोहचवता त्या वस्तूंची खुल्या बाजारात विक्री करायची, असे उद्योग चालवले जात आहेत. यास सरकारी यंत्रणाही तितकीच जबाबदार असल्याचे या लोकांचे म्हणणे आहे. रेशनवरील धान्य वितरणात सुसूत्रता यावी, यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करण्यात येत असला तरी, त्यातून होणारे गैरप्रकार अद्याप तसेच होत असल्याचे जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.

लाभार्थ्यांना न्याय मिळणार का?

रास्तभाव धान्य दुकानातून धान्य घेणाऱ्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये शिक्षणाचा अभाव असल्याने अशा षडयंत्राच्या विरोधात लढण्याचा अजिबात प्रयत्न करीत नाही. याचाच गैरफायदा घेतला जात असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी रेशन दुकानदार लाभार्थ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत असत. आधुनिक तंत्राचा वापर करीत दुकानदारांवर अनेक निर्बंध आणण्यात आले: परंतु वरिष्ठ स्तरावर होणारे गैरप्रकार तसेच आहे. जे सर्वसमान्य लाभार्थ्यांच्या कल्पने पलीकडचे आहेत.

एकाही गोदामात पुरेसा शिधा नाही

वेळेत पुरवठा होण्यासाठी जिल्ह्यातील २१ गोदामांमध्ये पुरेशा प्रमाणात शिधा धान्य असावे लागते. जिल्ह्यातील या २१ पैकी अलिबाग, पोयनाड, पेण येथील गोदामांमध्ये फक्त साखर आलेली आहे. तर इतर गोदामांमध्ये रवा आहे, तर चणाडाळ नाही, साखर आहे तर गोडतेल नाही अशी परिस्थिती आहे. यात किती दिवस जातील हेच पुरवठा अधिकाऱ्यांना सांगता येत नसल्याने आनंदाच्या शिधासाठी किती दिवस वाट पहावी लागणार, असा प्रश्न लाभार्थी विचारू लागले आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुकानदारांवर बंधने आणण्यात आली, परंतु वरच्या पातळीवरील वितरण व्यवस्था, वाहतूक ठेकेदाराच्या नेमणुका यामध्ये कमालीचा गोंधळ आहे. यामध्ये सर्वसामान्य लाभार्थी भरडला जात आहे. शासनाने ज्या चांगल्या योजना सुरू केलेल्या आहेत, त्यांचा लाभ योग्य व्यक्तींना मिळत नाही. - प्रमोद घोसाळकर, जिल्हाध्यक्ष-रायगड जिल्हा रेशन दुकानदार संघटना

एकाही गोदामामध्ये पूर्ण कीट नाही, चार जिन्नस मिळून एक कीट पूर्ण झाल्याशिवाय त्याचे वितरण करता येत नाही. त्यामुळे अद्याप वाटप सुरू झालेले नाही. वाहतूक कंत्राटदारामुळे या जिन्नस पोहचण्यात अडथळा येत आहे. त्यामुळे आनंदाचा शिधा केव्हा मिळेल हे नक्की सांगता येत नाही. - सर्जेराव सोनवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी- रायगड

गरीब माणूस येणाऱ्या सणाची तयारी तीन चार महिन्यापूर्वीपासून करीत असतो, तर आनंदाचा शिधा वाटपासंदर्भात शासनाने दिलेला शब्द पाळण्यासाठी पुर्व तयारी करता येत नाही, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. म्हणे वाहतूक कंत्राटदारामुळे विलंब होत आहे. हा सर्व प्रकार टक्केवारी घेण्यासाठी आहे. गोरगरीबाच्या ताटातला काढून टक्केवारी घेणाऱ्यांना काय मिळणार? - संजीव नाईक, लाभार्थी

logo
marathi.freepressjournal.in