रायगडची जनताच तुम्हाला बाटलीत बंद करील सुनील तटकरे यांचे पोलादपूरच्या सभेत प्रत्युत्तर

भरत गोगावले यांनी सांगितले की, आपण २०-२५ हजारांच्या फरकाने निवडून आलो तेव्हा विरोधकांनीही आपले फोन करून अभिनंदन केले. पण खासदार गीते यांनी कधीही फोन करून अभिनंदन केले नाही. जो आमचा होऊ शकला नाही तो माणूस तुमचा तरी कसा होईल, असा सवालही आ.गोगावले यांनी यावेळी केला.
रायगडची जनताच तुम्हाला बाटलीत बंद करील
सुनील तटकरे यांचे पोलादपूरच्या सभेत प्रत्युत्तर

शैलेश पालकर/पोलादपूर:

संसदेत सहा वेळा निवडून गेल्यानंतर विरोधकांची भाषा सैतान, बाटलीबंद, बूच  लावेन, अशी असेल तर त्यांना हे शब्द शोभत नाहीत. विकासाची कामे सांगता येत नसतील तर अशी भाषा कायम ठेवा, म्हणजे रायगडची जनताच तुम्हाला बाटलीमध्ये बंद करेल, असे सणसणीत प्रत्युत्तर रायगड ३२ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खा. सुनील तटकरे यांनी पोलादपूर येथील प्रचारसभेमध्ये दिले.

याप्रसंगी व्यासपीठावर आ. भरत गोगावले, कोकण प्रदेश युवासेना कोअर कमिटी अध्यक्ष विकास गोगावले, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अपेक्षा कारेकर, पोलादपूरचे ज्येष्ठ व्यापारी व माजी सरपंच शिरीष साबळे, शिवसेना महिला संघटिका निलीमा घोसाळकर, भाजपचे तालुका अध्यक्ष तुकाराम केसरकरआदी मान्यवर उपस्थित होते.

भरत गोगावले यांनी सांगितले की, आपण २०-२५ हजारांच्या फरकाने निवडून आलो तेव्हा विरोधकांनीही आपले फोन करून अभिनंदन केले. पण खासदार गीते यांनी कधीही फोन करून अभिनंदन केले नाही. जो आमचा होऊ शकला नाही तो माणूस तुमचा तरी कसा होईल, असा सवालही आ.गोगावले यांनी यावेळी केला. सुनील तटकरे यांना खासदार होण्यासाठी मतदान करताना मतदान यंत्रावर शिवसेनेचे धनुष्यबाण शोधत बसू नका. यावेळी आपल्याला घडयाळ चिन्हासमोरचे बटन दाबायचे आहे, असे आवर्जून सांगितले. यावेळी आमची सर्व ताकद मतांच्या रूपाने तुमच्या पारडयात टाकू आमच्यावेळी तुम्हीही कोणतीही कसर सोडू नका, असे आवाहनही गोगावले यांनी केले.

कोणतीही विकासकामे ठोसपणे न करता कितीवेळी निवडून येण्याचा ध्यास आहे, हे लक्षात घेऊन मतदारांनी त्यांना घरी बसविले आहे, अशी जोरदार टीका केली. यावेळी विकास गोगावले यांनीही अनंत गीते यांनी केलेल्या भुलथापांचा पाढा वाचून गीते यांनी महाड विधानसभा मतदारसंघ आणि रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये कशी फसवणूक केली, याबाबत माहिती देत मतदारांमध्ये जनजागृती केली.

गोगावले व तटकरे यांच्यात दिलजमाई

पोलादपूर तालुक्यातील लोकांना ढालकाठी जवळ आणि सुतारवाडी खूप दूर आहे. अडीअडचणीच्यावेळी आमचे दरवाजे नेहमीच मदतीसाठी उघडे आहेत, अशी टीका आम्ही विरोधात असताना खा. तटकरे यांच्याविरोधात करीत होतो. पण मुठी उघडया ठेवून मदत करण्याची दानत असलेला नेता म्हणून खा.तटकरे यांनी नेहमीच दातृत्व सिध्द केले आहे, असे प्रशंसोदगार महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी सवाद येथील सभेमध्ये काढले तर खा.सुनील तटकरे यांनीदेखील त्यांच्या भाषणामध्ये, बगलेत नॅपकिन घेऊन मंत्रालयामध्ये फिरणारा आमदार म्हणून भरतशेठ गोगावले यांच्यावर अनेकदा टीका केली. मात्र, याच आ.भरतशेठ गोगावले यांनी विकासकामांचा निधी प्रचंड प्रमाणात आणून जो धडाका लावला, त्यामुळे त्यांचे भरभरून कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे सांगितले. दोघांच्या या विधानामुळे त्यांच्यातील दिलजमाई कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट झाली.

ही विधानसभेची रंगीत तालीम

महाराष्ट्राच्या विधानसभेची रंगीत तालीम लोकसभा निवडणूक आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारने ज्या योजना आणल्या आहेत. सीएए कायदा देशातील मुस्लिमांच्या विरोधात आहे हा अपप्रचार केला जात आहे. शेजारी मुस्लिम राष्ट्रात राहणाऱ्या हिंदू समाजाला देशाचं नागरिकत्व मिळण्यासाठी आहे, असे तटकरे यांनी सांगितले. ते म्हणाले की, यानंतरच्या काळात तटकरे आणि गोगावले यांना महाड पोलादपूर तालुक्यांतील रोजगार, सिंचन, पर्यटन तसेच विविध प्रश्नांमध्ये हातात हात घालून जनतेची सेवा करताना पाहायला मिळेल. अशी ग्वाही देऊन तटकरे यांनी जनताच आता घडयाळयाच्या चिन्हासमोरील बटन दाबून केंद्रामध्ये महायुतीचे सरकार स्थापन करून मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यास सिध्द झालेली पाहायला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे यांनी, पोलादपूर तालुक्यात सवाद गाव आहे पण महाड शहरालगत असल्याने या सप्तक्रोशीतील लोकांना चौऱ्यांशीचा फेरा घालून पोलादपूरला तालुक्याच्या ठिकाणी यावे लागत असल्याने सवाद येथे स्वतंत्र सभा घेतली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in