बालशोषणाच्या चित्रफिती शेअर करणे महागात; रायगडमध्ये एकाच दिवशी ५ जणांविरोधात गुन्हे; सायबर पोलिसांच्या कारवाईने खळबळ

सोशल मीडियाचा वापर करताना कोणतीही चित्रफीत किंवा छायाचित्र पुढे पाठवण्यापूर्वी त्याची कायदेशीर बाजू तपासणे किती महत्त्वाचे आहे, याचा प्रत्यय रायगड जिल्ह्यातील पाच जणांविरोधात झालेल्या कारवाईतून आला आहे.
बालशोषणाच्या चित्रफिती शेअर करणे महागात; रायगडमध्ये एकाच दिवशी ५ जणांविरोधात गुन्हे; सायबर पोलिसांच्या कारवाईने खळबळ
बालशोषणाच्या चित्रफिती शेअर करणे महागात; रायगडमध्ये एकाच दिवशी ५ जणांविरोधात गुन्हे; सायबर पोलिसांच्या कारवाईने खळबळ'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

अलिबाग : सोशल मीडियाचा वापर करताना कोणतीही चित्रफीत किंवा छायाचित्र पुढे पाठवण्यापूर्वी त्याची कायदेशीर बाजू तपासणे किती महत्त्वाचे आहे, याचा प्रत्यय रायगड जिल्ह्यातील पाच जणांविरोधात झालेल्या कारवाईतून आला आहे. अल्पवयीन मुला-मुलींच्या लैंगिक शोषणाशी संबंधित चित्रफिती आणि छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत एकाच दिवशी पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रायगड पोलिसांना अल्पवयीन मुला-मुलींच्या लैंगिक शोषणाशी संबंधित आक्षेपार्ह सामग्री सोशल मीडिया तसेच अन्य डिजिटल माध्यमांतून प्रसारित होत असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या निर्देशानुसार सायबर पोलिसांनी या प्रकरणांचा तांत्रिक तपास सुरू केला. सायबर पेट्रोलिंग, डिजिटल माहितीचे विश्लेषण आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संबंधित पाच व्यक्तींची माहिती निष्पन्न करण्यात आली. त्यानंतर मुरूड, रेवदंडा, दादर सागरी, खालापूर आणि खोपोली पोलीस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. संबंधित आरोपींचे वय १६ ते २८ वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS), बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (POCSO) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.

पालकांनीही आपल्या पाल्यांच्या मोबाईल आणि सोशल मीडिया वापराबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन रायगड पोलिसांनी केले आहे. अशा प्रकारची सामग्री आढळल्यास तातडीने सायबर पोलिसांना माहिती द्यावी.

आँचल दलाल, पोलीस अधीक्षक

logo
marathi.freepressjournal.in