रायगड जिल्ह्यात शेकापला धक्का! बदलत्या भूमिकेमुळे बहुसंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असून आज जिल्ह्यातील चार पुलांची निविदा मंजूर झाली आहेत. त्यामध्ये महत्त्वाच्या अशा साळाव-रेवदंडा पुलाची निविदा सुद्धा निघाली आहे, असे सुनील तटकरे म्हणाले.
रायगड जिल्ह्यात शेकापला धक्का! बदलत्या भूमिकेमुळे बहुसंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

संजय करडे

मुरूड-जंजिरा : शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा सहचिटणीस मनोज भगत व मुरूड तालुका चिटणीस अजित कासार यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढवली आहे. यावेळी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शेकाप कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला.

यावेळी बोलताना तटकरे म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शेकापच्या नेत्यांकडून मला सांगण्यात आले की, मुरूड तालुक्यात प्रचारासाठी येऊ नका आपली तर अडीच हजार मते आहेत. आम्ही बघून घेऊ त्यामुळे या निवडणुकीत प्रचाराला आलो नाही. मी निवडणुकीत कोणालाही मदत केली नाही. आमदार महेंद्र दळवी हे स्वमेहनतीवर निवडून आले आहेत. परंतु आपले अपयश लपविण्यासाठी माझ्यावर खापर फोडले जाते. शेतकरी कामगार पक्षाच्या बदलत्या भूमिकेमुळे आज कार्यकर्ते दुसरा मार्ग अवलंबत आहेत. याचे आत्मचिंतन करणे खूप गरजेचे आहे.

यावेळी खासदार तटकरे आपल्या भाषणात म्हणाले की, रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असून आज जिल्ह्यातील चार पुलांची निविदा मंजूर झाली आहेत. त्यामध्ये महत्त्वाच्या अशा साळाव-रेवदंडा पुलाची निविदा सुद्धा निघाली आहे. इंडिया आघाडीला फक्त माझा द्वेष आहे. त्यामुळे ते टीका करीत आहेत. गीते यांनी टीका करण्यापेक्षा विकासकामांवर बोलावे. त्यांनी सूर्यकांत दळवी, रामदास कदम, भरत गोगावले, आदींसह अनेकांचा विश्वासघात केला आहे. कुणबी समाजाने मते दिली. निदान त्यांच्यासाठी तरी विधायक कामे करणे आवश्यक होत. गीते यांची विकासकामे दाखवा व एक हजार रुपये मिळवा, असे माझे खुले आव्हान आहे.

यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील, मनोज भगत आदी उपस्थित होते. राज्याचा तसेच मतदारसंघाचा विकास होण्यासाठी आम्ही आमची भूमिका बदलून भाजप सरकारमध्ये सहभागी झालो, असे यावेळी कृषी मंत्री धंनजय मुंडे यांनी सांगितले. तटकरे हेच कोकणचा विकास करणारे एकमेव नेतृत्व असून जनता त्यांच्या पाठीशी निश्चित उभी राहणार यात शंका नसल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.

मिठागर, खामदे, चिचघर, नांदले, आगरदांडा, राजपुरी, वावडुंगी, जोसरंजन, खारआंबोली, उसरोली, अदाड, पोफळी, वावे, नांदगाव, खारीकवाडा, खारदौडकुले, चिकणी, सर्वे, काशीद, भोईघर, काकलघर, म्हाळुंगे, बोर्ली, मांडला, शिरगाव, चोरढे आदी भागांतील शेकडो कार्यकर्त्यांनी शेकापमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये यावेळी प्रवेश केला.

logo
marathi.freepressjournal.in