Raigad : डिझेलच्या वाढत्या दरांमुळे मच्छिमार आक्रमक; सरकारविरोधात मतदान करण्याचा इशारा

डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या रायगड जिल्ह्यातील मच्छिमारांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.
Raigad : डिझेलच्या वाढत्या दरांमुळे मच्छिमार आक्रमक; सरकारविरोधात मतदान करण्याचा इशारा
Raigad : डिझेलच्या वाढत्या दरांमुळे मच्छिमार आक्रमक; सरकारविरोधात मतदान करण्याचा इशाराप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मुरूड-जंजिरा : डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या रायगड जिल्ह्यातील मच्छिमारांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. मच्छिमारीसाठी सवलतीच्या दरात डिझेल उपलब्ध करून द्यावे, ही प्रमुख मागणी मच्छिमार संघटनांनी केली आहे. येत्या आठ दिवसांत हा प्रश्न मार्गी न लागल्यास केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध म्हणून आगामी सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये सरकारविरोधात मतदान करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघाच्या सभेत घेण्यात आल्याची माहिती संघाचे संचालक विजय गिदी यांनी दिली.

डिझेल हा समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकांचा प्रमुख इंधनस्रोत आहे. मात्र, वाढत्या डिझेल दरांमुळे प्रत्येक मासेमारी फेरीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

परिणामी, मासेमारी व्यवसाय करणे दिवसेंदिवस कठीण होत असून मच्छिमार संस्था आणि संपूर्ण मत्स्यव्यवसाय क्षेत्र आर्थिक अडचणीत सापडले आहे.

दोन हजार नौकांना डिझेल पुरवठा

रायगड जिल्ह्यातील ४० मच्छिमार सहकारी संस्थांकडे डिझेल पंप असून, या संस्थांमार्फत सुमारे दोन हजार नौकांना डिझेलचा पुरवठा केला जातो. शासनाकडून वर्षाकाठी ४७ हजार ८४० किलोलिटर डिझेलचा कोटा मंजूर असल्याची माहिती देण्यात आली. मच्छिमारांना सवलतीच्या दरात डिझेल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या सहकारी संस्थांवर आहे. प्रत्येक नौकेच्या मासेमारी फेरीमध्ये इंधनावर मोठा खर्च होतो. येत्या आठ दिवसांत शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास सरकारविरोधात निषेध नोंदविण्यात येईल. तसेच आगामी निवडणुकांमध्ये सरकारविरोधात मतदान करण्याची भूमिका घेतली जाईल, असे विजय गिदी यांनी स्पष्ट केले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in