

मुंबई : राज्यभरात गेल्या २४ तासांपासून पावसाने रौद्ररूप धारण केले असून अनेक भागांत पावसाचे जोरदार धुमशान सुरू आहे. परिणामी रायगडमधील अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे, तर रायगडच्या उत्तर भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे पेण, नागोठणे, पाली, रोहा परिसरात देखील पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र जोरदार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे रायगड जिल्ह्यातील जनजिवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.
'एसटी'मध्ये अडकलेल्यांची सुटका
रायगडच्या रसायनी येथे एसटी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ही बस पुराच्या पाण्यात अडकली होती. शिवाय या बसमध्ये एकूण आठ प्रवासी अडकून पडले होते. कर्जत-पेण मार्गावरील सारसई येथील ही घटना असून पाताळगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात बस अचानक आडकली होती.
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून अनेक नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. अंबा, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास, या नद्यांनी आपली पातळी ओलांडली असून अनेक सकळ भागात पाणी शिरले आहे. शिवाय अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.