रायगड पालकमंत्री पदावरून तू-तू मैं-मैं; गोगावलेंनी डिवचले; आनंद परांजपेंचा पलटवार

रायगड व नाशिक जिल्ह्यांतील पालकमंत्री पदाचा तिढा आजही कायम आहे. विशेष करून रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरून महायुतीतील घटक पक्ष शिवसेना व राष्ट्रवादीत तू तू मैं मैं सुरूच आहे. खांद्यावर वेटरसारखा रुमाल टाकला, अशा शब्दांत शिवसेना नेते रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांना पुन्हा एकदा डिवचले आहे.
रायगड पालकमंत्री पदावरून तू-तू मैं-मैं; गोगावलेंनी डिवचले; आनंद परांजपेंचा पलटवार
Published on

मुंबई : रायगड व नाशिक जिल्ह्यांतील पालकमंत्री पदाचा तिढा आजही कायम आहे. विशेष करून रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरून महायुतीतील घटक पक्ष शिवसेना व राष्ट्रवादीत तू तू मैं मैं सुरूच आहे. खांद्यावर वेटरसारखा रुमाल टाकला, अशा शब्दांत शिवसेना नेते रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांना पुन्हा एकदा डिवचले आहे. मंत्री गोगावले यांच्या विधानावर पलटवार करत रायगड जिल्ह्यातील थ्री इडियट्सचा घोटाळा सात दिवसांत बाहेर काढणार, असा इशारा राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला.

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून महायुतीत धुसफूस सुरूच आहे. ५ डिसेंबर २०२४ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ जाहीर करण्यात आले. त्यानंतर राज्यातील पालकमंत्री पदाची जबाबदारी त्या त्या विधानसभा क्षेत्रातील मंत्र्यांवर सोपवण्यात आली. रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यावर सोपवण्यात आली. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते, मंत्री भरत गोगावले यांनी आक्षेप घेतला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाला स्थगिती दिली आहे. मात्र आजही रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरून महायुतीतील घटक पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी यांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले आहेत.

गेल्या महिन्यात सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्या नॅपकीन स्टाईलची नक्कल केली होती. त्यावेळी भरत गोगावले म्हणाले होते की, सुनील तटकरेंना अजून सरावाची गरज आहे. त्यानंतर आता भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सुनील तटकरे यांनी रुमाल खांद्यावर टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु हा रुमाल म्हणजे गोरगरीबांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे आम्ही काखेत घेऊन असतो. परंतु काही लोकांनी हा रुमाल वेटरसारखा खांद्यावर टाकला. आम्ही सगळ्यांनी त्यांच्यासाठी जीवापाड काम केले आहे. त्यांना निवडून आणले आहे आणि त्यांनी आता काही करामती दाखवायला सुरुवात केली आहे, असा टोला मंत्री गोगावले यांनी सुनील तटकरे यांना लगावला आहे.

‘थ्री इडियट्स’चे आर्थिक घोटाळे बाहेर काढणार - आनंद परांजपे

रायगडातल्या 'थ्री इडियट्स'मधल्या एका 'इडियट्स'ने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याविरुद्ध गरळ ओकली असून त्या 'इडियट्स'ची गुन्हेगारी आणि आर्थिक घोटाळे सात दिवसांत बाहेर काढण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.

भाजपला नाशिकचे पालकमंत्रीपद?

रायगड जिल्ह्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. मंत्री गिरीश महाजन यांना अप्रत्यक्ष नाशिकचे पालकमंत्री म्हणून घोषित केले असताना अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक नसून नाशिक जिल्ह्यातील लोकांची सेवा करण्यासाठी मी समर्थ आहे. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्री पदाच्या रेसमध्ये नसल्याचे सांगत नाशिकचे पालकमंत्री पद भाजपला, असे संकेत भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.

logo
marathi.freepressjournal.in