रायगड जिल्ह्यात पूरस्थिती; पाताळगंगा, कुंडलिका, अंबा नद्यांनी ओलांडली धोका पातळी

रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पाताळगंगा, कुंडलिका, अंबा नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. यामुळे रायगड जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, पुढील काही तासांत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
रायगड जिल्ह्यात पूरस्थिती; पाताळगंगा, कुंडलिका, अंबा नद्यांनी ओलांडली धोका पातळी
Published on

रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पाताळगंगा, कुंडलिका, अंबा नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. यामुळे रायगड जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, पुढील काही तासांत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता अलिबाग, रोहा, तळा, महाड आणि पोलादपूर या पाच तालुक्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मागील २४ तासात रायगड जिल्ह्यात १२९.३ मिमी इतका पाऊस पडला आहे.

बुधवारी रात्रीपासून धो धो पडणाऱ्या पावसाने पाताळगंगा नदी, रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी आणि नागोठणेतील आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नागोठणे शहरातील अनेक भागांत पाणी साचले असून, काही घरांमध्येही पाणी शिरले आहे.

याशिवाय वरंध जलसाठाही पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे महाड परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. तर, सावित्री आणि उल्हास नदी दुथडीभरून वाहत आहेत.

पुलांवरून वाहणाऱ्या पाण्याने रस्ते ठप्प

पाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाली-खोपोली रस्त्यावर अंबा नदीचे पाणी आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. उन्हेरे फाटा येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबवण्यात आली आहे. याशिवाय सुधागड तालुक्यातील भेराव गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पाणी साचल्यामुळे मार्ग बंद करण्यात आला आहे. पेणमधील खरोशी आणि दूरशेत गावाचा पुराच्या पाण्याने संपर्क तुटला आहे.

आपत्ती व्यवस्थापन सज्ज, नागरिकांना सूचना

जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात करण्यात आली आहेत. किनारपट्टी भागातील मच्छीमार व स्थानिक नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत रायगडसह मुंबई, ठाणे आणि उत्तर कोकणात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in