रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; तळा तालुक्यात वीज पडून मुलाचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांची तारांबळ उडवली.
रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; तळा तालुक्यात वीज पडून मुलाचा मृत्यू
रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; तळा तालुक्यात वीज पडून मुलाचा मृत्यू(Photo-X/@airnews_arngbad)
Published on

धनंजय कवठेकर/रायगड

रायगड जिल्ह्यात शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांची तारांबळ उडवली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, ठिकठिकाणी झाडे कोसळून वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तळा तालुक्यातील फळशेत गावातील वेदांत साळुंखे (१४) हा मुलगा अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्युमुखी पडला.

पनवेल शहरात वादळी वाऱ्यामुळे धुळीचे प्रचंड लोट निर्माण झाले. भरदुपारी परिसर धुळीने भरून गेल्याने झाल्याने वाहतूक संथ गतीने सुरु होती. खारघर परिसरातदेखील अचानक आलेल्या धुळीच्या वादळाने नागरिकांची दाणादाण उडाली.

रोहा शहरात अचानक सुटलेल्या तुफानी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या. वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. पाली-सुधागड परिसरात दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवातझाली. पाली शहरासह ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक होता. बाजारपेठेत नागरिकांची धावपळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. खोपोली-खालापूर तालुक्यात मुसळधार पावसासह गारांचा वर्षाव झाला. वावंढळ परिसरात तुफानी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली.

काही भागांमध्ये वीजपुरवठाही खंडित झाल्याची माहिती समोर आली आहे. कवेळे येथील निलेश गणपत तळकर यांच्या पोल्ट्री शेडचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे शेड उडून गेल्याने सुमारे दीड ते दोन हजार कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in