रायगड लोकसभा मतदारसंघ आता कोणाच्या हाती लागणार?

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर जोशी यांना मुंबईपासून नांदवीपर्यंत बॅ. अंतुले यांनी सहकार्य केले होते. २०२४ मध्ये अनंत गीते यांना पुन्हा काँग्रेसी मतांचा रतिब घालण्याची अपरिहार्यता राज्यातील महाविकास आघाडीच्या माध्यमातून निर्माण झाली आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघ आता कोणाच्या हाती लागणार?

शैलेश पालकर/पोलादपूर : येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये रायगड मतदारसंघावर कोण वर्चस्व प्राप्त करतो, मतदार कोणाला तेथे कौल देतात हे औत्स्युक्याचे ठरणार आहे. यापूर्वी बॅरिस्टर अंतुले यांच्या तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असणारे तेथील अनेक तालुके गावे यांच्यावर गेल्या काही वर्षांमधील अनेक राजकीय घडामोडींनंतर रायगड जिल्हा व तेथील मतदारांवरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक समीकरणे वा गणिते बदलली गेली आहेत. आता यावेळच्या लढतीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे प्रभावी ठरतात की आपली खासदारकी परत मिळविण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अनंत गीते यशस्वी ठरतात, याकडे रायगडच्या मतदारांचे लक्ष लागले आहे. यंदाची ही रायगडची निवडणूक अलीकडच्या काही वर्षांमधील राजकीय उलथापालथींमुळे काय फलनिष्पत्ती देईल ते आता पाहणे उत्कंठावर्धक ठरणार आहे.

यापूर्वीचे बॅ. अंतुले हे व्यक्तिमत्त्व आजही रायगडवासींच्या मनात आहे खरे पण राजकीय समीकरणे बदलण्याने परिस्थितीही बदलली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या साथीला चक्क बॅ. अंतुले यांचे चिरंजीव नाविद अंतुले हे शिवसेनेच्या गळाला लागले होते. नाविदबाबाचे निधन झाले आणि त्यांना विधानसभेवर पाठविण्याची चर्चा करणाऱ्यांना त्यांचा शब्द पूर्ण करण्याची गरज राहिली नाही. अलीकडेच, मरहूम बॅ. अंतुले यांच्या पत्नी नर्गिसबानू यांचे निधन झाले आहे. त्यामुळेच आता रायगडचा हा मतदारसंघ बॅ.अंतुले यांच्या अभावाचा असे या निवडणुकीचे वर्णन करता येऊ शकेल.

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर जोशी यांना मुंबईपासून नांदवीपर्यंत बॅ. अंतुले यांनी सहकार्य केले होते. २०२४ मध्ये अनंत गीते यांना पुन्हा काँग्रेसी मतांचा रतिब घालण्याची अपरिहार्यता राज्यातील महाविकास आघाडीच्या माध्यमातून निर्माण झाली आहे. २००९ च्या रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीदरम्यान गीते यांच्या महाड येथील प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांच्या मुखातून बॅ. अंतुले यांच्याप्रती यशवंतराव चव्हाण यांच्या 'गोदाकाठचे अश्रू' पुस्तकातील उतारा वाचताना 'हिरवा साप' असे वर्णन उच्चारले गेल्याचा लाभ अनंत गीते यांना झाला होता. २००९ साली बॅ.अंतुले यांचा पराभव अनंत गीते यांच्याकडून ४ लाख १३ हजार ५४६ मते मिळवित झाला होता.

यानंतर २०१४ मध्ये संपूर्ण देशात मोदी लाट आली असताना स्वाभाविकपणे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार अनंत गीते यांनी ३ लाख ९६ हजार १७८ मते मिळवित पुन्हा रायगडचे खासदार होताना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांचा (३ लाख ९४ हजार ६८ मते) पराभव करून विजयी झाले. यावेळी शेकाप आणि मनसे उमेदवार रमेश कदम यांना १ लाख २९ हजार ७३० मते मिळाल्याने तसेच नोटा या बटनावर १ लाख २९ हजार ७३० मते मिळाल्याने सुनील तटकरे यांचा २११० मतांनी निसटता पराभव झाला.

या काळात गीतेचा संदेश काय, अशी चर्चा जोर धरू लागली आणि शिवसेना भाजप युतीकाळामध्येही गीते आणि सुरेश प्रभू यांना मंत्रिपदे देत जवळ करून मोदी यांनी शिवसेनेला वेगळाच संदेश पाठविला होता. यानंतर २०१९ मध्ये अंतुलेपुत्र नाविदबाबा हे सोबत असूनही गीते यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांना ४ लाख ८६ हजार ९६८ मते मिळवित विजय संपादन करता आला तर अनंत गीते यांना ४ लाख ५५ हजार ५३० मते मिळवूनही ३१४३४ मतांनी पराभव पत्करावा लागला होता.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर अचानक शिवसेना व भाजपमध्ये फूट पडून प्रथम मुख्यमंत्रीपदी फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांचा तर त्यानंतर मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांचा शपथविधी झाला. काही महिन्यांमध्येच कोरोना लॉकडाऊन सुरू झाला. यानंतर विकासकामे ठप्प झाली. लोकसभा आणि संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर केंद्रात आणि राज्यामध्ये मोदी सरकार विरोधात भूमिका घेऊन केंद्रात विरोधी खासदार आणि राज्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे घटक पक्ष असे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वरूप राहिले आणि अलीकडेच सत्तांतर झाल्यानंतर राज्यामध्ये पुन्हा सत्ताधारी पक्षाचे घटक पक्ष व केंद्रामध्ये घटकपक्ष असे स्वरूप राहिल्याने आता खासदार तटकरे हे केंद्रातील मोदी सरकारचे सत्ताधारी आघाडीचे उमेदवार आहेत.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, रोहा, कर्जत, श्रीवर्धन हे पाच विधानसभा मतदार संघ असलेला पूर्वीचा कुलाबा-३ आता पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, दापोली, गुहागर असा रायगड ३२ लोकसभा मतदार संघ झाल्यानंतर 'केंद्रीय मंत्री झाल्यानंतर पराभव अटळ' या राजकीय गृहितकानुसार ठरणार की कसे ते पाहावे लागेल. पराभूत झालेल्या माजी केंद्रीय मंत्र्यांना म्हणजे बॅ.अंतुले यांच्याप्रमाणे पुन्हा निवडून आणणाराही असल्याने अनंत गीते यांना निश्चितच पुनरागमनाची संधी मिळू शकेल की विरोधी खासदार सुनील तटकरे यांना सत्ताधारी खासदार म्हणून पुन्हा संधी देणारा ठरणार आहे, याबाबत मतदारांच्या हाती निर्णय सोपविला जाणार आहे.

सहा विधानसभा मतदारसंघातून १६ लाख ५३ हजार ९३५ मतदार संख्या असून यामध्ये ८ लाख १३ हजार ५१५ पुरुष मतदार तर ८ लाख ४० हजार ४१६ महिला मतदारांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in