रायगड लोकसभा मतदारसंघ : परिवर्तन व पुनरागमनाचा साक्षीदार; बॅ. अंतुलेंप्रमाणे अनंत गीतेंनाही पुनरागमनाची संधी मिळणार का?

रायगड म्हणजे पूर्वीचा कुलाबा लोकसभा मतदारसंघ...
रायगड लोकसभा मतदारसंघ : परिवर्तन व पुनरागमनाचा साक्षीदार; बॅ. अंतुलेंप्रमाणे अनंत गीतेंनाही पुनरागमनाची संधी मिळणार का?

शैलेश पालकर

रायगड म्हणजे पूर्वीचा कुलाबा लोकसभा मतदारसंघ. तत्कालीन कुलाबा लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्री असलेल्या उमेदवाराचा म्हणजेच बॅ. अंतुले यांचा पराभव झाला. हे असे अघोषित समीकरण अस्तित्वात होते. मात्र, या समीकरणासोबतच बॅ. अंतुले यांना त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी होऊन पुनरागमनाची संधीही या कुलाबा लोकसभा मतदारसंघाने दिल्याचे दिसून येते. कुलाबा लोकसभा मतदारसंघाची अशी अघोषित समीकरणे जर रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय अवजड उद्योगमंत्री म्हणून काम करणाऱ्या अनंत गीते यांच्या पराभवास कारणीभूत ठरली असतील तर त्याच अघोषित समीकरणातून अनंत गीते पुन्हा लोकसभेवर निवडून जाण्यासाठी हा रायगड मतदारसंघ किती साथ देतो, त्याकडे आता जाणकारांचे लक्ष लागले आहे.

नव्याने पुनर्रचना झालेल्या रायगड लोकसभेची पाचव्यांदा उमेदवारी मिळणार हे गृहित धरून मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यासंदर्भात केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री अंतुले यांच्या विधानाबाबत संसदेमध्ये चर्चा घडवून अंतुलेंविरोधात ते देशविरोधी असल्याचे वातावरण निर्मिती करण्यात गीते यांनी यश मिळवले होते. खा. गीते यांना ४ लाख १३ हजार ५४६ मते तर बॅ. अंतुले यांना २ लाख ६७ हजार २५ मते मिळाली.

यानंतर रायगड लोकसभा मतदार संघातील १६ व्या लोकसभा निवडणुकीमध्ये खा. गीते यांना ३ लाख ९६ हजार १७८ मते मिळाली तर ना. तटकरे यांना ३ लाख ९४ हजार ६८ मते मिळाली आणि खा.गीते केवळ २ हजार ११० मतांनी विजयी झाले.

या निकालांनी अनंत गीते यांच्या विरोधातील मतदारांचा कौल स्पष्ट झाला. विजयामुळे केंद्रात पाच वर्षे अवजड उद्योगमंत्री म्हणून संधी मिळाल्याने ते पुन्हा मतदार संघावर घट्ट पकड करतील,अशी अपेक्षा होती. मात्र, केंद्रात मंत्री झालेल्या उमेदवाराचा पराभव हे सूत्र कायम राहिले.

त्यानंतर गीते यांना रायगड लोकसभा मतदारसंघाचे 'केंद्रीय मंत्री झाल्यानंतर पराभव अटळ' या अनाकलनीय राजकीय गृहितकाचे परिणाम म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांना ४ लाख ८६ हजार ९६८ मते मिळवित विजय संपादन करता आला तर अनंत गीते यांना ४ लाख ५५ हजार ५३० मते मिळवूनही ३१४३४ मतांनी पराभव पत्करावा लागला होता.

गीते-तटकरे लढतीत ‘नोटा’चा मोठा वापर

'नोटा' बटनाचा वापर तब्बल २० हजार ३६२ मतदारांनी केल्यामुळे तसेच सुनील तटकरे यांच्याशी नामसाधर्म्य असलेल्या सुनील तटकरे या अपक्ष उमेदवाराला ९ हजार ८४९ मते मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांचा पराभव झाल्याचे उघड झाले होते.

आजवर चार वेळा लोकसभेवर जाण्याची संधी

राजीव गांधी यांच्या हत्येनंतर गोविंदराव निकम यांच्याकडून अनंत गीते यांना त्यावेळी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतरच्या लाटेमध्ये खा. गोविंदराव निकमांना पराभूत करून पहिल्यांदा खासदारकीची संधी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून अनंत गीते यांना मिळाली होती. १९९६-१९९८ पासून सलग चारवेळा म्हणजे १९९८-१९९९, १९९९-२००४ व २००४ ते २००९ अशी चारवेळा त्यांना लोकसभेवर जाण्याची संधी मिळाली. आता या लोकसभा निवडणुकीत त्यांना पुनरागमनाची संधी मिळेल का, ते पाहावे लागेल.

पुनर्रचित रायगड लोकसभा मतदारसंघ

बॅ. अंतुले यांच्यासमोर पुनर्रचित रायगड लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार उपलब्ध नसल्याने पारंपरिक प्रतिस्पर्धी शेकापक्ष हा रायगड जिल्हा परिषदेतील महायुतीच्या वळचणीला गेला होता. तसेच शेकापचे प्राबल्य असलेले कुलाबा-३ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, उरण व कर्जत हे विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघाला जोडले गेले तर पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड हे मतदारसंघ रायगड लोकसभेला जोडले गेले. यापैकी महाड हा विधानसभा मतदारसंघ अनंत गीते यांच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या रत्नागिरी लोकसभा मतदारसंघापैकी असून कुलाबा लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचित रायगड लोकसभा मतदारसंघाचे पहिल्यांदाच उमेदवार राहिलेल्या अनंत गीते यांनी बॅ. अंतुले यांचा पराभव केला.

logo
marathi.freepressjournal.in