रायगडात महायुतीचे नवे राजकीय समीकरण; मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर शिंदेसेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र

रायगड जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात सुरू असलेल्या तीव्र राजकीय संघर्षानंतर आता अनपेक्षितरीत्या महायुतीतील तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत.
रायगडात महायुतीचे नवे राजकीय समीकरण; मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर शिंदेसेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र
रायगडात महायुतीचे नवे राजकीय समीकरण; मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर शिंदेसेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र
Published on

धनंजय कवठेकर/ रायगड

रायगड जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात सुरू असलेल्या तीव्र राजकीय संघर्षानंतर आता अनपेक्षितरीत्या महायुतीतील तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत. जिल्हा परिषद सत्तास्थापनेच्या निमित्ताने या नव्या राजकीय समीकरणाला आकार मिळाला असून, दीर्घकाळ सुरू असलेल्या वादावर पडदा पडल्याची चर्चा रंगू लागली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान महायुतीतील तिन्ही पक्षांनी अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे किंवा वेगवेगळ्या आघाड्यांतून लढत दिली होती. या काळात आरोप-प्रत्यारोप, शाब्दिक चकमकी आणि पाडापाडीचे राजकारण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. निवडणुकीनंतर सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने एकत्र येत शिंदे सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती आखली होती.

या सत्तास्थापनेदरम्यान मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र दळवी, अनिकेत तटकरे आणि सुधाकर घारे हे प्रमुख नेते एकत्र आल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झालेली कटुता काही प्रमाणात कमी झाल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, या घडामोडींनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसविरोधातील भूमिका काहीशी मवाळ केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेनंतर आता रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढाही लवकरच सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in