

पेण : सुमारे दीड महिना पावसाने दडी मारल्यामुळे रायगड जिल्ह्यातील भात पीक संकटात सापडले आहे. भात पिकाला यंदा जेमतेम दीड महिनेच पाऊस मिळाल्याने लोंबी भरण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई मिळवण्यासाठी कृषी विभागाच्या कार्यालयात खेटे मारण्यास सुरुवात केली आहे. कमी झालेले भात लागवड क्षेत्र, ‘एल- निनो’मुळे पर्जन्यमानात आलेली तूट, शेतात पाणी नसल्यामुळे न भरलेले दाणे, करपत चाललेली शेती आणि भात पिकावर होत असलेला कीड-रोगांचा प्रादुर्भाव; यामुळे रायगड जिल्ह्यात यंदा भाताच्या उत्पादनात मोठी घट होण्याची चिन्हे आहेत.
रायगड जिल्ह्यात भात लागवडीचे सरासरी ८७ हजार ५३६ हेक्टर क्षेत्र आहे. मागील वर्षी ७० हजार ४४६ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली होती. म्हणजेच सरासरी क्षेत्राच्या ८०.४७ टक्के क्षेत्रावर भात लागवड झाली होती. यंदा ६१ हजार १०१ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली. हे सरासरी क्षेत्राच्या ६९.८० टक्के आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा भात लागवड क्षेत्रात सुमारे १३ टक्क्यांनी घट झाली आहे.
पावसाने ओढ दिल्याने लोंबी येण्यास अडचण
कोकणात अतिवृष्टीमध्ये तग धरणारे एकमेव पीक म्हणून भात शेती ओळखली जाते. भात पिकाला प्रत्येक पाच टप्प्यांमध्ये पावसाची मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते. १२० ते १४० दिवसांमध्ये भातशेती पिकत असल्यामुळे या काळात सर्वाधिक पावसाची गरज भासत असते. यंदा सुरुवातीला मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे भाताने पहिल्या दोन टप्प्यांमध्ये चांगला जोर धरला होता. पेरणी, लावणी आणि त्यानंतर रोपांना तग धरण्यासाठी आवश्यक पाऊस पडला; परंतु त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने लोंबी येण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. हळव्या जातीच्या भातांना लोंबी आल्या असल्या तरी त्यांच्यात तांदूळ भरण्याचे प्रमाण मात्र अत्यंत कमी आहे.
भाताची वाढ खुंटली
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत पाऊस कमी पडला. त्या तुलनेत उन्हाची तीव्रता अधिक होती. त्यामुळे शेतातील पाण्याचे बाष्पीभवन झाले आणि शेतात पाणी राहिले नाही. जमिनीला भेगा पडल्या. भातरोपे फुटव्याच्या अवस्थेत असताना पाणी न मिळाल्याने त्यांची वाढ खुंटली. भाताच्या कणसांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत पुरेसे पाणी मिळणे आवश्यक असते. मात्र, याच कालावधीत पाऊस न झाल्याने कणसांमध्ये दाणे पूर्णपणे भरण्याची शक्यता कमी झाली. सध्या पावसाअभावी भाताची रोपे करपू लागली आहेत. भातशेतीवर कीड-रोगांचाही प्रादुर्भाव वाढू लागला आहे, असे भात उत्पादक शेतकरी शरद जाधव यांनी सांगितले.
मजुरी परवडेना!
लागवडी, फवारणीबरोबर मजुरांचे वाढलेले दर जेरीस आणत आहेत. त्यातच ऊन पावसाच्या खेळामुळे भाताची वाढ खुंटली आहे. यंदा खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशी परिस्थिती आहे. भाताची वाढ खुंटली असून फुटवा देखील निघाला नाही. उत्पादन खर्च वाढल्यामुळे तांदूळ देखील महागणार, अशी माहिती भात उत्पादक शेतकरी रामचंद्र मांढरे यांनी दिली. शासनाचे निर्देश आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी सांगितले.
पर्जन्यमानही घटले
यंदा २८९४.७ मिमी पाऊस पडला. म्हणजेच वार्षिक सरासरीच्या सुमारे ९२ टक्के पाऊस झाला आहे. ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाचा खंड पडला. जून महिन्यात केवळ ११ दिवस पाऊस झाला आणि सरासरीच्या ५१.१ टक्के पावसाची नोंद झाली. जुलै महिन्यात २५ दिवस पाऊस पडला. या महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १२०६.९ मिमी असताना यंदा १८४३.९ मिमी पाऊस झाला. म्हणजेच सरासरीच्या १५२ टक्के पाऊस पडला.