रायगडचा हापूस बाजारात; अलिबागच्या वरुण पाटील यांनी पटकावला मान

अलिबागच्या नारंगी गावचे वरुण पाटील हे तरुण बागायतदार आहेत. साधारण ४० हेक्टर क्षेत्रावर त्यांची बाग आहे.
रायगडचा हापूस बाजारात; अलिबागच्या वरुण पाटील यांनी पटकावला मान

धनंजय कवठेकर/ अलिबाग : अलिबाग तालुक्यातील नारंगी गावचे तरुण बागायतदार वरुण पाटील यांच्या बागेतील पहिला हापूस आणि केशर जातीच्या आंब्यांच्या पहिल्या पेट्या मुंबईकडे रवाना झाल्या. शनिवारी हा आंबा वाशी बाजारात दाखल होईल. या आंब्याला डझनाला १० हजार रुपयांपर्यंत दर मिळेल, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे. रायगडचा आंबा सलग तिसऱ्या वर्षी सर्वात प्रथम पाठवण्याचा मान पाटील यांनी मिळवला आहे.

रत्नागिरीच्या हापूस आंब्याची पहिली पेटी ही मागील महिन्यात मुंबई बाजारात दाखल झाली होती. रायगड जिल्ह्यात हापूस आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. रायगडच्या हापूस आंब्याची चव वेगळी असल्याने येथील आंब्यालाही मुंबईसह देश-विदेशात मोठी मागणी आहे.

रायगड जिल्ह्यात अलिबागसह रोहा, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, मुरूड, माणगाव या तालुक्यांमध्ये आंब्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. सातत्याने बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसत आहे. लांबणारा पाऊस, खराब हवामान, पिकांवर येणारे रोग अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वरुण पाटील यांनी यशस्वीरीत्या आंब्याची काढणी करून रायगड जिल्ह्यातून पहिला आंबा बाजारात पाठवण्याचा मान पटकावला आहे.

एकमेव बागायतदार

अलिबागच्या नारंगी गावचे वरुण पाटील हे तरुण बागायतदार आहेत. साधारण ४० हेक्टर क्षेत्रावर त्यांची बाग आहे. त्यांच्या बागेतून दरवर्षी साधारण ४० हजार इतक्या आंब्यांच्या पेट्यांचे उत्पादन निघते. यंदाही जानेवारी महिन्यात रायगड जिल्ह्यातून आंबा मुंबई बाजारात पाठवणारे ते एकमेव बागायतदार ठरले आहेत. शुक्रवारी पाटील यांनी आपल्या बागेतून आंब्याची पहिली काढणी केली. यात हापूसबरोबरच केशर जातीच्या आंब्याचाही समावेश आहे. पहिल्याच काढणीत प्रत्येकी दोन डझनच्या चार पेट्या इतका आंबा मिळाला आहे. आज हा माल ट्रान्सपोर्टला पाठवला असून शनिवारी तो वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in