जव्हार : दाभोसा धबधब्यावर रेलिंग कोसळले; दोघे दरीत, वनकर्मचाऱ्यांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण, Video

जव्हार तालुक्यातील प्रसिद्ध दाभोसा धबधबा येथे रविवारी दुपारी सुरक्षेसाठी उभारलेले जुने लोखंडी रेलिंग अचानक तुटल्याने दोघे पर्यटक दरीत कोसळले.
जव्हार : दाभोसा धबधब्यावर रेलिंग कोसळले; दोघे दरीत, वनकर्मचाऱ्यांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण, Video
Published on

जव्हार : जव्हार तालुक्यातील प्रसिद्ध दाभोसा धबधबा येथे रविवारी दुपारी सुरक्षेसाठी उभारलेले जुने लोखंडी रेलिंग अचानक तुटल्याने दोघे पर्यटक दरीत कोसळले. मात्र, वनविभागाचे कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि उपस्थित पर्यटकांनी तातडीने बचावकार्य हाती घेतल्याने दोघांचेही प्राण वाचले. या दुर्घटनेत दोघे पर्यटक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पावसाळ्यामुळे दाभोसा धबधब्यावर सध्या पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. रविवारीही अनेक पर्यटक धबधब्याच्या निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. यावेळी दोन पर्यटक छायाचित्र काढण्यासाठी रेलिंगला टेकून उभे असताना अचानक रेलिंगचा आधार तुटला आणि ते दरीत कोसळले. या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक व पर्यटकांच्या मदतीने दोघांना सुरक्षितपणे दरीतून बाहेर काढण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जव्हार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याची प्राथमिक माहिती जव्हार पोलिसांकडून मिळाली.

सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

दुर्घटनेनंतर दाभोसा धबधबा परिसरातील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धोकादायक ठिकाणी बसवण्यात आलेल्या जुन्या लोखंडी रेलिंगची नियमित तपासणी व देखभाल करण्यात आली होती का, याच्या चौकशीची मागणी होत आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in