

मुंबई : हजरत निजामुद्दीन-म्हैसूर एक्स्प्रेसमध्ये दिवा लावून प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या एका प्रवाशावर मध्य रेल्वेने कारवाई केली आहे. या आरोपीवर विविध कलमानुसार कारवाई करून नोटीस देण्यात आली आहे.
गाडी क्रमांक १२७८२ हजरत निजामुद्दीन-म्हैसूर एक्प्रेसच्या कोच ए-१ मधील बर्थ क्रमांक १७ वर एका प्रवाशाने दिवा लावून पूजा केल्याबाबत भुसावळ येथील कमर्शियल कंट्रोलकडून माहिती मिळाली. खंडवा येथील कर्तव्यावर असलेले तिकीट तपासनीस रमन कुमार शर्मा यांनी या घटनेची माहिती दिली. पुढील आवश्यक कारवाईसाठी त्या प्रवाशाला भुसावळ रेल्वे स्थानकावर गाडीतून खाली उतरवण्यात आले.
चौकशीदरम्यान, गरिबा (वय ५५) असे या प्रवाशाने सांगितले की, सायंकाळची प्रार्थना करताना त्याने आपल्या आरक्षित बर्थवर दिवा लावला होता. कर्तव्यावर असलेल्या टीटीईने त्याला दिवा विझवण्याचा सल्ला दिला होता आणि समजावून सांगितले होते की, उघड्या ज्योतीमुळे आग लागू शकते आणि प्रवाशांच्या तसेच रेल्वेच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, त्या प्रवाशाने प्रार्थना पूर्ण झाल्यानंतरच दिवा विझवण्याचा आग्रह धरला. टीटीईने आपल्या मोबाईल फोनवर या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले होते.
त्याच्याकडून आगपेटी, पितळी दिवा आणि स्टीलचा डबा जप्त करण्यात आला. ही कृती प्रवाशांच्या आणि रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी संभाव्य धोका निर्माण करणारी असल्याने १ सप्टेंबर रोजी रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १५३ आणि १४५(ब) अन्वये आरोपीवर कारवाई करण्यात आली.
मध्य रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी गाडीत कोणत्याही ज्वलनशील वस्तू बाळगू नयेत किंवा दिवे, मेणबत्त्या किंवा अगरबत्ती लावू नयेत; कारण यामुळे आग लागू शकते आणि हजारो प्रवाशांचे प्राण धोक्यात येऊ शकतात.