मुंबई : गणेश विसर्जनाच्या दिवशी हक्काने हजेरी लावणाऱ्या वरुणराजा काही काळ विश्रांती घेऊन आता नव्या दमाने बरसण्याच्या तयारीत आहे. पावसाने पाठ फिरवल्याने गेले काही दिवस उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुनश्च: पावसाच्या दमदार आगमनाचे संकेत दिले असून सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची पुन्हा एकदा बॅटिंग पाहायला मिळणार आहे.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा पाऊस दाखल होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. राज्यातील अनेक भागात गणेशोत्सव कालावधीत पावसाने विश्रांती घेतली. तर काही ठिकाणी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, आता भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तवला आहे. गणपती विसर्जनाच्या सोहळ्यानंतर राज्यात काही भागांमध्ये पाऊस पुन्हा हजेरी लावेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
२ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २१ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्रात पाऊस कोसळणार आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर , पुणे, बीड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे.
देशातील बहुतांश भागात पावसाची संततधार सुरू आहे. हा पाऊस आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले.