
तब्बल महिन्याभर दडी मारल्यानंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. यामुळे चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना जरा दिलासा मिळाला आहे. तसंच राज्यावर कोसळणारं पिण्याच्या पाण्याचं संकट देखील कमी होण्यात मदत झाली आहे. राज्या येत्या चार ते पाच दिवसात वेगवेगळ्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंबई, कोकण, ठाण्यासह नाशिक, जळगाव, धुळे अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांत मध्यम ते हलक्या स्परुपाचा पाऊस झाला आहे. तसंच सातारा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, जालना नांदेड या भागात देखील तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
दरम्यान, हवामान विभागाने आता पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात हा पाऊस कोसळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हवामान तज्ज्ञ के. एस होसळीकर यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. यात त्यांनी येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच कोकण आणि गोव्यात देकील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल अशी माहिती होसळीकर यांनी दिली आहे.
राज्यात मुकत्यात पडलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. आता पुन्हा मुसळधार पाऊसाचा अंदाल वर्तवल्याने राज्यातील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होण्याची शक्यता आहे.