राज्यात २६ ते २८ डिसेंबर दरम्यान पावसाचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून वाढलेला थंडीचा कडाका कमी होणार असून उत्तरेकडून येणारे थंड कोरडे वारे व अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्र हवेमुळे २६ ते २८ डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वाढलेला थंडीचा कडाका कमी होणार असून उत्तरेकडून येणारे थंड कोरडे वारे व अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्र हवेमुळे २६ ते २८ डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार आहे. यामुळे राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर कमी झाला आहे. राज्यात २५ आणि २६ डिसेंबरला ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळे थंडीचा जोर ओसरणार आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान वाढणार आहे. तसेच २६ ते २८ डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानंतर वर्षाखेरीस म्हणजे सोमवार, ३० डिसेंबरपासून राज्यात थंडी वाढणार आहे.

राज्यात गेले काही दिवस कडाक्याची थंडी पडली होती. राज्यातील काही शहरांचे तापमान पाच ते सहा अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. परंतु आता वातावरणात बदल झाला आहे. वातावरणातील हा बदल पश्चिमी विभोक्ष (वेस्टर्न डिस्टर्बन्स)मुळे होत आहे. त्यामुळेच २६ डिसेंबरपासून हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी २९ अंश सेल्सिअस, तर सांताक्रुझ केंद्रात २८.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

असा आहे पावसाचा अंदाज

२६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग

२७ डिसेंबर रोजी खान्देश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी

२८ डिसेंबर रोजी खान्देश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे) आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.

या भागातील शेतकऱ्यांनी या पुढील कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in