मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी
मुंबई महापालिकेने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला. ही बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात शाळा आणि शिक्षकांनी पालकांच्या प्रतिनिधींना कळवावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच आवश्यक ती खबरदारी घेऊन शालेय स्तरावर योग्य समन्वयाची खात्री करावी.
प्रशासनाने दिला पावसाचा इशारा
मंत्रालयातून नागरिकांना फोन मेसेजद्वारे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ' भारतीय हवामान विभागाने मुंबई, मुंबई उपनगर, पुणे , ठाणे , रायगड जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.'
मुंबई महानगराला उद्या सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी रेड अलर्ट
बीएमसीने पाणी कपात घेतली मागे
बीएमसी २९ जुलैपासून १० टक्के पाणीकपात मागे घेणार आहे. ही कपात ५ जून रोजी लागू करण्यात आली होती. परंतु सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणारे चार तलाव ओसंडून वाहत आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील एकूण पाणीसाठा गुरुवारी त्यांच्या एकूण क्षमतेच्या ६६ टक्क्यांवर पोहोचला आहे.
एअर इंडियाची उड्डाणे प्रभावित
मुंबईतील मुसळधार पावसामुळे उड्डाण संचालनावर परिणाम होत आहे आणि परिणामी एअर इंडियाची काही उड्डाणे रद्द आणि वळवण्यात आली आहेत. एअर इंडिया २५ जुलै २०२४ रोजी प्रवासाचे बुकिंग असलेल्याना पूर्ण परतावा किंवा एक-वेळचे नि:शुल्क रीशेड्युलिंग ऑफर केली जाणार आहेत.
IMD चा आज गुजरात आणि महाराष्ट्रासाठी 'अत्यंत मुसळधार पावसाचा' अंदाज
IMD ने आज गुजरात आणि महाराष्ट्रासाठी 'अत्यंत मुसळधार पावसाचा' अंदाज वर्तवला आहे, महाराष्ट्रात उद्यापर्यंत जोरदार पावसाची अपेक्षा आहे आणि गुजरात पुढील तीन दिवसांत त्याची तयारी करेल.मुंबई, मुसळधार पावसासाठी अनोळखी शहर, जोरदार फटका बसला आहे, ज्यामुळे IMD ने राज्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पश्चिम आणि मध्य भारताच्या अंदाजामध्ये आज मध्य प्रदेशात अतिवृष्टीचा समावेश आहे आणि गोव्यात २७ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा समावेश आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभाग
मुंबई, पुणे, ठाणे शहरांसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात भेट देऊन राज्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीचा आढावा घेतला तसेच संबंधित अधिकाऱ्यांना परस्पर समन्वय व सहकार्य ठेवून बचत व मदतकार्य करण्याचे निर्देश दिले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक श्री. लहू माळी यांनी त्यांना माहिती दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहान
नागरिकांनीही अतिवृष्टी व पुरापासून बचावासाठी आवश्यक काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनीही नागरिकांना सक्रिय मदत करावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
पुण्यात विजेचा शॉक लागून ३ तरुणांचा मृत्यू
पुणे शहरात एक घक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात तीन तरुणांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. डेक्कन नदीपात्रातील पुलाची वाडी येथील ही घटना आहे. अंडा भुर्जीची गाडी दुसऱ्या जागी हलवत असताना शॉक लागून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
नवी मुंबई
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रात्रीपासून सुरू असलेली जोरदार पर्जन्यवृष्टी विचारात घेऊन व हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करण्यात येते की, महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये.
नवी मुंबई : शाळांना सुट्टी जाहीर
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच नागरिकांना काही महत्त्वाचे काम असल्याशिवाय बाहेर पडू नये, असा सल्लाही दिला आहे. शहरातील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याचेही महापालिकेने सांगितले.
समुद्राला भरतीची वेळ
दुपारी 2.51 वा. 4.54 मि. ची मोठी उधाण भरती असल्याने व आपले नवी मुंबई शहर समुद्रसपाटीपासून खालच्या भागात वसलेले असल्याने शहरातील काही सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. तरी अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी सतर्क राहून आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर बचाव कार्य व्यवस्थित सुरू –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, पुणे, रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे, मात्र जिल्हा, मनपा प्रशासन सज्ज असून हे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत, ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथले बचाव कार्य वेगाने सुरु आहे. काळजीचं कारण नाही, मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावं असं आवाहन मी करतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आर्मी, नेव्हीच्या तुकड्या देखील सज्ज
एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकात समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
साठलेले पाणी काढण्याचे काम सुरु
मुंबईत कुर्ला, घाटकोपर येथे साठलेले पाणी काढण्याचे काम सुरु आहे. मुंबईत २५५ पंप सुरु आहेत. मी मुंबई मनपा आयुक्तांना संपूर्ण यंत्रणा या कामी लावण्याचे निर्देश दिले आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.
रायगड जिल्ह्यातील वरिल तालुक्यातील अतिवृष्टीमुळे जाहीर झालेल्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थीहित लक्षात घेता व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या आज ( गुरवार) दिनांक २५ जुलै २०२४ रोजी सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या फक्त या तालुक्यातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.
डॉ. पूजा रौदळे, संचालिका परीक्षा व मूल्यमापन मंडळ
पुणे - ताम्हिणी घाट
रायगड मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्यामुळे घाटातून वाहतूक बंद करण्यात आली आहे. घाट साधारण ४-५ तास बंद राहिल असा अंदाज आहे.
दरड कोसळून रस्त्यावर माती
रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाटात मुळशी हद्दीमध्ये काही ठिकाणी तसेच माणगाव हद्दीत तीन ठिकाणी दरड कोसळून रस्त्यावर माती आलेली आहे.
पुणे-कोलाड रस्ता वाहतुकीसाठी बंद
माणगाव हद्दीतील रस्त्यावर आलेली माती जेसीबी द्वारे दूर करण्याचे काम सुरू आहे. जीवित हानी नाही. परंतु पाच ते सहा ठिकाणी रस्त्यावर माती आलेले असून बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर झाडे पडलेले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून पुणे-कोलाड रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.
- तहसीलदार माणगाव
मुसळधार पावसात मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी
बीएमएस कार्यक्षेत्रातील भागांना पाणीपुरवठा करणारा मोडकसागर तलाव पूर्ण भरला असून तो भरून वाहत आहे. बीएमसीने त्यांच्या अधिकृत X हँडलवरून एका पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे.
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या क्षेत्रात दमदार पाऊस
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. परिणामी पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.
> सद्यस्थितीत विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर ही चार जलाशये ओसंडून वाहू लागली आहेत. आज सकाळी ६ वाजेपर्यंत पाणीसाठा ६६.७७ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.
> या संपूर्ण स्थितीचा आढावा लक्षात घेता, मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यात सध्या लागू असलेली १० टक्के पाणी कपात ही सोमवार दिनांक २९ जुलै २०२४ पासून मागे घेण्यात येत आहे.
> तसेच, ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभागातील ग्रामपंचायतीना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून होणा-या पाणीपुरवठ्यातील १० टक्के कपात देखील सोमवार दिनांक २९ जुलै २०२४ पासून मागे घेण्यात येत आहे.
पुणे
महाराष्ट्रातील पुण्यात मुसळधार आणि संततधार पावसाने कहर केला, जिथे गुरुवारी पावसाशी संबंधित घटनांमध्ये किमान चार जणांचा मृत्यू झाला, तर शहरातील सखल भागात अनेक घरे आणि निवासी सोसायट्या जलमय झाल्या, ज्यानंतर लोकांना बाहेर काढले जात आहे, अधिकाऱ्यांनी सांगितले. .