"...तेव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते", राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप

"भाषा मेली तर सगळंच संपलं हे विसरू नका. तुमची ओळखच तुम्ही कोणते भाषिक आहात ह्यातून होते. मराठी बोलणाऱ्यांची संख्या जर बघितली तर आपण जगात दहाव्या क्रमांकावर आहोत. थोडक्यात जगातील मोठी लोकसंख्या मराठी बोलणारी आहे. पण आम्ही..."
"...तेव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते", राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप

आज नवी मुंबईत विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. वाशीच्या सीडको प्रदर्शन केंद्रावर पार पडणाऱ्या या तीन दिवसीय संमेलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी मराठी शाळांचा मुद्दा उपस्थित करत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना राज्यातील सगळ्या शाळांमध्ये पहिली ते दहावी मराठी भाषा सक्तीची करण्याची विनंती केली. तसेच, "मराठी लोकंच एकमेकांशी बोलताना हिंदी का वापरतात हे मला कळत नाहीये. आणि आपलीच मराठी भाषा जेंव्हा राजकीय दृष्ट्या दुय्यम लेखण्याचा प्रयत्न जेंव्हा होतो तेंव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते", असेही राज यावेळी म्हणाले.

पहिली ते दहावी मराठी भाषा सक्तीची करा-

या संमेलनात बोलताना राज यांनी दीपक केसरकर यांना, राज्यातील सगळ्या शाळांमध्ये मग त्या कुठल्याही असोत तिकडे पहिली ते दहावी मराठी भाषा सक्तीची करा, अशी विनंती केली. तसेच, "सध्या सीबीएएससी, आयसीएस्सी शाळांमध्ये ज्या राज्यात राहताय तिथली भाषा शिकवायची आणि शिकायची सोडून परदेशी भाषा का शिकवताय? परदेशी भाषा हव्या तितक्या शिका पण त्याच वेळेस मराठी पण शिकलीच पाहिजे, बोलता आलीच पाहिजे", असेही ते यावेळी म्हणाले.

...तर आपण का मागे राहतोय?

"ह्या देशाच्या पंतप्रधानांना जर त्यांच्या राज्याबद्दल, त्यांच्या भाषेबद्दल प्रेम वाटतं. गिफ्ट सिटी असो की हिऱ्यांचा व्यापार जर गुजरातमध्ये न्यावीशी वाटते किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटी पेक्षा मोठा पुतळा गुजरातमध्ये उभारावासा वाटतो, थोडक्यात काय जर त्यांना त्यांच्या राज्याबद्दलचं आणि भाषेबद्दलचं प्रेम लपवता येत नसेल तर आपण का लवपतोय, का मागे राहतोय?", असा सवालही राज यांनी यावेळी केला.

मराठी माणसाला घर नाकारायची हिंमत होते कारण...

मराठी माणसाला मुंबई घर नाकारण्याच्या घटना घटल्या आहेत. त्यावरही राज यांनी दृष्टीक्षेप टाकला. जेव्हा महाराष्ट्रात मराठी माणसाला जैन माणूस घर नाकारतो, तेव्हा काय करायचे? हे गुजरात, तामिळनाडू, आसाम, केरळ या राज्यात करून दाखवा. पैसे असूनसुद्धा मराठी माणसाला घर नाकारायची हिंमत होते, याला आमच्या सरकारांचे बोटचेपे धोरण कारणीभूत असल्याचे राज यांनी म्हटले.

तसेच, मराठी माणसाकडे पैसे असताना त्याला घर नाकारले जात असेल, तर हे खपवून घेतले जाणार नाही. मराठी माणसाकडे कुठे आहे पैसा असे म्हणणारे गल्लीच्या बाहेर पण गेलेले नाहीत. त्यांना काय माहिती की महाराष्ट्रभर मराठी लोकांनी किती अफाट कर्तृत्व दाखवून पैसा उभा केलाय, असेही राज म्हणाले.

...तर सगळंच संपलं हे विसरू नका-

"भाषा मेली तर सगळंच संपलं हे विसरू नका. तुमची ओळखच तुम्ही कोणते भाषिक आहात ह्यातून होते. मराठी बोलणाऱ्यांची संख्या जर बघितली तर आपण जगात दहाव्या क्रमांकावर आहोत. थोडक्यात जगातील मोठी लोकसंख्या मराठी बोलणारी आहे. पण आम्ही आमच्याच राज्यात दुसऱ्या भाषेमध्ये गोट्यांसारखे घरंगळत का जातो. माझी आज तुम्हाला एकच विनंती आहे की तुमच्या समोर कोणीही येऊ दे त्याच्याशी मराठीतच बोला", असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

या संमेलनात बोलताना त्यांनी मराठी आणि मराठी माणसासाठी त्यांनी आणि पक्षाने अनेक आंदोलने केली असून अंगावर केसेस घेऊन तुरुंगात गेल्याचे सांगितले. तसेच, "मी अत्यंत कडवट मराठी आहे आणि माझ्यावरचे संस्कार पण तसेच आहेत. महाराष्ट्र ही काय ताकद आहे हे जसं जसं मला समजत गेलं तसं तसं मी महाराष्ट्राच्या प्रेमात अधिक पडत गेलो", असेही राज म्हणाले.

माझा भाषेला विरोध नाही, पण...

"सध्या आपण महाराष्ट्राकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेर असलेल्या मराठी लोकांनी मराठीची, महाराष्ट्राची श्रीमंती जरूर इतर लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे. पण आपल्याच महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये जेंव्हा मराठीची उपेक्षा होते, जेंव्हा तिकडे सर्रास हिंदी कानावर पडते तेंव्हा मात्र त्रास होतो. माझा भाषेला विरोध नाही. पण हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही देशातल्या इतर भाषांसारखीच एक भाषा आहे. ह्या देशात राष्ट्रभाषेचा निवाडा कधीच झाला नाही. केंद्र आणि राज्य सरकार ह्यांच्यातील व्यवहारासाठी हिंदी आणि इंग्रजी ह्या भाषा वापरल्या जातात इतकंच. बाकी हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही. पण जेंव्हा मी हे १५,२० वर्षांपूर्वी बोललो तेंव्हा माझ्या अंगावर सगळे धावून गेले. जेंव्हा ते अंगावर आले तेंव्हा त्यांना मी गुजरात हायकोर्टाचा निर्णय दाखवला", असेही त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in