प्रतिनिधी/मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेचे संमिश्र पडसाद उमटत आहेत. मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. मात्र मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मात्र राज ठाकरे यांच्या भूमिकेची पाठराखण केली आहे. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. विरोधकांचा यामुळे अपेक्षाभंग झाल्याने त्यांची कोल्हेकुई सुरू आहे. कार्यकर्ते हे समजून घेतील असे ते म्हणाले. दरम्यान, बिनशर्त पाठिंब्यानंतर राज ठाकरे सक्रिय होऊन महायुतीचा प्रचारही करण्याची चर्चा सुरू आहे. त्याबाबत हा निर्णय राज ठाकरेच घेतील, असे प्रकाश महाजन म्हणाले.
राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल संमिश्र पडसाद उमटत आहेत. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांची पाठराखण करताना सांगितले, लोकसभा निवडणूक देशव्यापी असते. देशाची सध्याची स्थिती आणि देशहित लक्षात घेऊन राज ठाकरे यांनी ही भूमिका घेतली आहे. विधानसभेला काय भूमिका घ्यायची हे राज ठाकरेच सांगतील. आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलोही आहोत. भूमिका बदलणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. राज ठाकरे हे आधुनिक काळातील कर्ण आहेत. हिंदुत्वाच्या नावावर कोणी मदत मागत असेल तर राज ठाकरे यांनी ती खुलेपणाने दिली असल्याचे प्रकाश महाजन म्हणाले.
पंकजा मुंडे यांच्याशी तर माझे नाते आहेच. याआधीही मी राज ठाकरे यांची परवानगी घेउन त्यांचा प्रचार केला होता. आता तर त्या महायुतीतच आहेत. त्यांचा निश्चित प्रचार करेन, असेही प्रकाश महाजन यांनी स्पष्ट केले. कार्यकर्ते देखील महायुतीचा प्रचार करायला तयार होतील, असेही ते म्हणाले.
दरम्यान, बिनशर्त पाठिंब्यानंतर राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचारही करणार अशी चर्चा सुरू आहे. तसे झाले तर महायुतीला त्याचा फायदा होऊ शकतो. मुंबई, पुणे, नाशिकसह मनसेची बऱ्यापैकी पकड असणाऱ्या भागांमध्ये राज ठाकरेंच्या जर प्रचारसभा झाल्या तर महायुतीच्या उमेदवारांना त्याचा निश्चितच फायदा होईल. राज ठाकरे प्रचाराला प्रत्यक्ष उतरणार का, या प्रश्नावर याचा निर्णय राज ठाकरेच घेतील, असेही प्रकाश महाजन यांनी स्पष्ट केले.
मंगलप्रभात लोढा राज ठाकरेंच्या भेटीला
राज्यातील भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र आपली ही सदिच्छा भेट होती. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण दरवर्षी राज ठाकरे यांना भेटतो, असे मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. मनसेला तीन जागांची ऑफर होती. दक्षिण मुंबईच्या जागेचाही त्यात समावेश होता. दक्षिण मुंबईच्या जागेवर भाजपाकडून राहुल नार्वेकर तसेच मंगलप्रभात लोढा यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे मंगलप्रभात लोढा यांनी राज ठाकरेंच्या घेतलेल्या भेटीला महत्त्व आहे. मात्र आपली ही भेट गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी होती, असे मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे.