नोकरी करण्यापेक्षा देणारे बना! स्थानिकांच्या जमिनींसाठी राज ठाकरे अलिबागमध्ये

महाराष्ट्रात जे उत्तम आहे ते आजकाल ओरबडण्याचा प्रयत्न केला जात आहे. ठाणे जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे.
नोकरी करण्यापेक्षा देणारे बना! स्थानिकांच्या जमिनींसाठी राज ठाकरे अलिबागमध्ये
Published on

पेण/ अलिबाग : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी १५ जानेवारी रोजी अलिबाग दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी 'जमीन परिषद' कार्यक्रमात बोलताना प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी चर्चा करताना महाराष्ट्रातील जमीन व्यवहारांबाबतच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. "तुमच्या पायाखालची जमीन निसटून चालली आहे, याची तुम्हाला जाणीव आहे का? जमिनी विकल्याचा तुम्हाला व्यवस्थित मोबादला दिला आहे का? तुमच्याकडे जर तुमची हक्काची जमीन नसेल, तर पुढील पिढीचं काय? असा सवाल राज ठाकरे यांनी स्थानिकांना केला.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील लोकांना भानच राहिलेलं नाही. तुमच्याकडे तुमची हक्काची जमीन नसेल तर तुम्ही कुठलेच नागरिक नाही. मोठमोठ्या प्रकल्पातून तुमच्या जमिनी बळकावल्या जाता आहेत. मराठी माणसाने मोठ्या प्रमाणात स्वतःच्या हक्काच्या जमिनी विकल्या आहेत. यामुळे पुणे, नाशिक, ठाणे आणि मुंबईची वाट आज लागली आहे. आज नरेळ, माथेरान पायथ्याच्या गृहप्रकल्पात परप्रांतीयांची घरकुलं आहेत. यासाठी मनसे कार्यकत्यांनी सतर्क राहिले पाहिजे, असे देखील आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना बोलताना केले आहे.

महाराष्ट्रात जे उत्तम आहे ते आजकाल ओरबडण्याचा प्रयत्न केला जात आहे. ठाणे जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. आज दुर्लक्ष कराल, उद्या माझ्यावर विश्वास ठेवाल. तुम्हाला धोका सांगतोय, आताच सावध व्हा. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. आपण आपल्या गोष्टी वाचवल्या पाहिजेत. असादेखील राज ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना सावधतेचा इशारा दिला आहे.

यावेळी पेण येथील पत्रकार उद्योजक अरविंद गुरव यांनी व्हिस्क क्लीनिंग प्रोडक्ट्स या त्यांच्या कंपनीमध्ये तयार होणाऱ्या स्वच्छतेसाठी लागणाऱ्या उत्पादनांची भेट राज ठाकरे यांना दिली. त्यावर राज ठाकरे यांनी या मराठी उद्योजकाचे कौतुक करून मला असे मराठी अपेक्षित आहेत, असे गौरवउद्गार काढले.

या जमीन परिषदेला बाळा नांदगावकर, नितिन सरदेसाई, अविनाश जाधव, राजू पाटील, संदीप देशपांडे, अभ्यंकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर, महिला जिल्हाध्यक्ष सपना राऊत, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आदिती सोनार, अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धू म्हात्रे, पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील, पेण उपशहर अध्यक्ष पंकज पाटील, युवा नेते अभय पाटील आदींसह मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्योगांमध्ये स्थानिकांना भागीदारी का नाही?

"बाहेरून रायगड, रत्नागिरी या भागामध्ये येणाऱ्या उद्योगांमध्ये स्थानिकांना भागीदारी का दिली जात नाही? तुमच्या जमिनी हातातून जाणार. दुबईला फक्त व्यवसाय जरी करायचा असेल, तर तुम्हाला तिथल्या एका अरबाला भागीदार म्हणून घ्यावं लागतं. मग रायगडमध्ये जर असे व्यवसाय येणार असतील, तर तुम्ही भागीदारी का नाही मागत?" असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in