

नवी मुंबई : शहर नियोजन, वाहतूककोंडी आणि नागरिकांचे अनेक ज्वलंत प्रश्न कित्येक वर्षांपासून गंभीर बनत चालले आहेत. मात्र, शासन ढिम्मपणे पाहत आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी केवळ इच्छाशक्तीची गरज आहे. त्यासाठी सर्व प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय, याची मी आतुरतेने वाट पाहतोय, असे साद मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाशीत नागरिकांना घातली.
‘मनसे वाहतूक सेना'चे अध्यक्ष संजय नाईक आणि सरचिटणीस नितीन खानविलकर यांनी अत्याधुनिक व्यावसायिक वाहन प्रदर्शन आणि वाहतूकदार मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ठाकरे यांनी वाहतूकदारांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन दिले. मात्र, वाहतूकदारांनीही आपल्या चालकांना नियमांचे पालन करण्यास सांगितले पाहिजे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सरकार, प्रशासन, वाहतूकदार आणि नागरिक यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी इच्छाशक्ती हवी
शहरांमध्ये वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना त्याच्या नियोजनाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. वाहनांची वाढती संख्या, अपुरे रस्ते, बेशिस्त पार्किंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे शहरांमधील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. नागरिक, वाहन चालक आणि सरकार या सर्वांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
वाहतूककोंडी झाली की पोलिसांना जबाबदार धरले जाते. मात्र, नागरिक नियम पाळत नसतील आणि शहरांच्या नियोजनात त्रुटी असतील, तर संपूर्ण दोष पोलिसांवर टाकणे योग्य नाही. स्वतः वाहतूक नियम पाळण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे.
राज ठाकरे