विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

मुंबईतील मराठीचा विजयी मेळावा हा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता. या मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही. महानगरपालिका निवडणुकीस अद्याप काही महिने बाकी आहेत. त्यावेळचे चित्र पाहून युतीबाबत निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी जाहीर केली. त्यामुळे शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
Raj Thackeray
संग्रहित छायाचित्र
Published on

नाशिक : मुंबईतील मराठीचा विजयी मेळावा हा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता. या मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही. महानगरपालिका निवडणुकीस अद्याप काही महिने बाकी आहेत. त्यावेळचे चित्र पाहून युतीबाबत निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी जाहीर केली. त्यामुळे शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

मराठी विजयी मेळाव्यात शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे नेते राज ठाकरे हे एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा झाली होती. या मेळाव्यात उद्धव-राज हे एकाच मंचावर आल्याने आगामी मनपा निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली.

सध्या नाशिकमध्ये मनसेच्या तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारपासून या शिबिराला सुरुवात झाली असून मनसे प्रमुख राज ठाकरे हे शिबिरासाठी इगतपुरी येथे दाखल झाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या शिबिराला महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी त्यांनी अनौपचारिक गप्पांदरम्यान विजयी मेळाव्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

राज्यात महायुती सरकारने हिंदी सक्ती केल्यानंतर त्याच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी आवाज उठवला. त्यानंतर ही सक्ती मागे घेतली गेल्यानंतर दोन्ही ठाकरेंनी मुंबईत विजयी मेळावा घेतला. २० वर्षांनी राज आणि उद्धव हे बंधू एकाच व्यासपीठावर आले. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत हे दोन्ही बंधू एकत्र लढणार, अशी चर्चा सुरू झाली.

‘आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठीच,’ असे वक्तव्य खुद्द उद्धव ठाकरे यांनी केले. जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल, असे ते म्हणाले होते. त्यामुळे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत युती होणार असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, राज ठाकरे हे मात्र सावधगिरीने पावले टाकताना दिसले. आता त्यांचे ताजे वक्तव्य हे त्याला बळ देणारे असल्याची चर्चा आहे.

हिंदी सक्तीच्या बाबतील आताच्या सरकारने जीआर काढला. मागील सरकारने त्याचा अहवाल स्वीकारला होता, पण त्याचा जीआर काढला नव्हता, अंमलबजावणी केली नव्हती, असे राज ठाकरे म्हणाले.

युतीचा सस्पेन्स कायम

आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्या, मग बघू, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे, तर दुसरीकडे राज ठाकरेंनीही युतीबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंची युती होणार की नाही याबाबत संभ्रम कायम राहिला आहे. ही युती होऊ नये यासाठी महायुतीकडून पडद्यामागून हालचाली सुरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

त्यानंतर युतीसंदर्भात निर्णय घेऊ!

मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठीच्या मुद्यावर होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही. तसेच नोव्हेंबर - डिसेंबरदरम्यान चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर युती संदर्भातील निर्णय घेऊ, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in