ठाणे : बीडमध्ये शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. या घटनेला प्रत्युत्तर देताना मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरही टोमॅटो, नारळ, बांगड्या आणि शेणफेक केली. त्यामुळे मुंबई, ठाण्यातील वातावरण तंग झाले असून तुम्ही सुपारी मारलीत, तर आम्ही नारळ फेकू, असा इशारा मनसेने दिला आहे. तर त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रतिइशारा शिवसेनेच्या ठाकरे गटाने दिला आहे.
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शिवसेनेतर्फे भगवा मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यासाठी निघालेल्या उद्धव ठाकरे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी मुलुंड ते ठाणेदरम्यान शेण, टोमॅटो, नारळ, बांगड्या फेक केली. त्यात ठाकरे यांच्या ताफ्यातील वाहनांच्या काचा फुटल्या. या घटनेनंतर सभेसाठी गडकरी रंगायतनमध्ये जमलेले उबाठा गटाचे कार्यकर्तेही समोरासमोर आल्याने या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
उद्धव ठाकरे हे गडकरी रंगायतनमध्ये दाखल होताच महिला मनसैनिकांनी घुसून गोंधळ घालत बांगड्या फेकल्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या प्रकारानंतर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवण्यात आला.