राज ठाकरेंना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण नाही; “निमंत्रण आल्यास…”  

भाजप नेते गिरीश महाजन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती दिली होती
राज ठाकरेंना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण नाही; “निमंत्रण आल्यास…”

 

राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती दिली होती. मात्र, या सोहळ्यासाठी राज ठाकरेंना कुठल्याही प्रकारचे निमंत्रण आले नसल्याचे समोर आले आहे. राज ठाकरेंच्या निकटवर्तीयांनी याबाबतची माहिती दिली असल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे बांधण्यात आलेल्या राम मंदिराच्या गर्भागृहात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला देशभरातील महत्वाच्या व्यक्तींना, सेलिब्रिटींना तसेच कलाकारांना निमंत्रण देण्यात आले आहे. यात राज ठाकरेंना देखील आमंत्रण दिल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले होते. यावर राज ठाकरेंच्या निकटवर्तीयांकडून राज यांना अद्याप तरी निमंत्रण आले नसल्याचे सांगण्यात आले. परंतु, त्यांना लवकरच निमंत्रण येण्याची शक्यता आहे. निमंत्रण आल्यानंतर राज ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहणार का?  याबाबत देखील तर्कवितर्क लावले जात आहेत.

 यापूर्वी राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा आखला होता. मात्र, भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज यांच्या दौऱ्याला विरोध केल्यानंतर कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी दौरा रद्द केला होता. आता मंदिर ट्रस्टकडून निमंत्रण आल्यास राज ठाकरे या सोहळ्याला जातील, अशी माहिती ठाकरे यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in