
कोकणातील राजापूर येथील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांचा विरोध पोलीस दलाने मोडून काढल्यानंतर मंगळवारी खोदकामाला सुरुवात झाली. यावेळी पोलिसांनी सुमारे 110 आंदोलकांना ताब्यात घेतले. दरम्यान, याचे जोरदार पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटत आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप शिंदे गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतानाच मनसेनेही याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
"कोकणातील प्रकल्पांबाबत राज ठाकरे यांनी यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोकणात रोजगाराच्या संधी फार कमी आहेत. त्यामुळे आज कोकणातील बहुतांश घरे रिकामी दिसत आहेत. कारण येथील तरुण रोजगाराच्या शोधात मुंबईत येतात. त्यामुळे पर्यटन कोकणात आणि काजू आणि आंबा यांसारख्या पिकांवर प्रक्रिया करणारे प्रकल्प कोकणात यावेत. त्यामुळे येथील स्थानिकांना रोजगार मिळेल", नितीन सरदेसाई म्हणाले.
कोकणात असे प्रकल्प आले की रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. मात्र, कोणत्याही परिस्थितीत स्थानिकांना पूर्ण विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून प्रकल्प मार्गी लावला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. ६ मे रोजी रत्नागिरीत राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यावेळी ते याबाबत सविस्तर भूमिका मांडतील, असे ते म्हणाले.