आपल्या हातात सत्ता देण्याचे राज ठाकरेंचे पुन्हा एकदा आवाहन

जिथे शक्य असेल तिथे मी बैठका घेईन. अनेक ठिकाणी बैठका सुरू होणार आहेत. अनंत चतुर्दशीनंतर सभा घेणार
आपल्या हातात सत्ता देण्याचे राज ठाकरेंचे पुन्हा एकदा आवाहन

मुंबईतील प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरात आज (मंगळवार) मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. राज यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये सध्या राज्यामध्ये चालू असलेल्या राजकीय प्रकरणाचा खरपूस समाचार घेतला. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शिंदे-फडणवीस सरकार, प्रभाग रचना आणि इतर विषयांवर त्यांनी भाष्य केले. राज ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर ते आज पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना ताकदीने निवडणूक लढविण्याचे आवाहन केले. त्याचवेळी फेरबदल करून निवडणूक लढवू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. जिथे शक्य असेल तिथे मी बैठका घेईन. अनेक ठिकाणी बैठका सुरू होणार आहेत. अनंत चतुर्दशीनंतर सभा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीवर मनसेने लक्ष केंद्रित केल्याचे त्यांच्या भाषणातून स्पष्ट होते. मनसे पुन्हा एकदा राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावेल याकडेही त्यांनी राजकीय विश्लेषकांचे लक्ष वेधले आहे. आपल्या हातात सत्ता देण्याचे आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केले आहे. ज्या लोकांना तुम्ही सत्ता दिली त्याचे काय केले हे सांगायलाही ते विसरले नाहीत. सत्ता दिल्यास राज्यातील टोल बंद करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. एकूण आगामी विधानसभा, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसे राज्यात ताकद उभी करेल, असा संदेश या मेळाव्यातून देण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in