“शरद पवार साहेबांसोबत राहूनही त्यांनी...” राज ठाकरेंनी केलं अजित पवारांचं कौतुक

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आज पुणे येथे पार पडली. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं.
राज ठाकरे अजित पवार
राज ठाकरे अजित पवार प्रातिनिधिक फोटो

पुणे: महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आज पुणे येथे पार पडली. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं. शरद पवार यांच्यासोबत राहूनही अजित पवारांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही असं राज ठाकरे म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे येथील जाहीर सभेतून पुणे शहराच्या सध्याच्या अवस्थेवर चिंता व्यक्त केली. शहराच्या विकासाकडे लक्ष जावू नये यासाठी जातीपातीचं राजकारण केलं जातंय, असं राज ठाकरे म्हणाले. १९९९ पासून येथे जातीपातीचं राजकारण केलं जात असल्याचं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला. दरम्यान शरद पवारांसोबत राहूनही अजित पवारांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांचा कौतुक केलं.

शरद पवारांवर राज ठाकरेंचे आरोप?

“या शहरांकडे नीट लक्ष दिलं जाऊ नये म्हणून इकडचे नेते तुम्हा आम्हाला जातीपातीमध्ये गुंतवून ठेवतायत. या जातीपातीतून बाहेर या. पहिल्यांदा तुमच्या विकासाचा विचार करा. एखादा माणूस असतो, जो स्वतःची कमजोरी लपवण्यासाठी जातीचा आधार घेतो,” असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही-

राज ठाकरे म्हणाले की, “अजित पवारांबद्दल माझे बाकी अनेक मतभेद असतील, पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो. अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. मी आजपर्यंत त्यांच्या साऱ्या गोष्टी पाहत आलोय. पण एका गोष्टीबाबतीत मी त्यांचं कौतुक करतो की, शरद पवार साहेबांसोबत राहूनही त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही.”

मशिंदींमधून फतवे निघतायत...

राज ठाकरे म्हणाले की, "आज मुस्लिम मोहल्यांमध्ये, मशिंदीमध्ये फतवे निघतायत...की काँग्रेसच्या उमेदवारांना सगळ्या मुसलमान समाजानं मदत करावी. अनेक सुज्ञ मुसलमान आहेत आहेत, ज्यांना अक्कल आहे, त्यांना समजतंय काय राजकारण चाललंय."

"जे चांगले मुसलमान आहेत, जे नोकरी करतात. ते ठीक आहेत. पण जे वाह्यात आहेत, जे दंगे घडवतात, ज्यांना १० वर्षात डोकं वर काढता नाही आलं, ते असले फतवे काढतायत..." असं राज ठाकरे म्हणाले.

तर राज ठाकरे आज फतवा काढतो...

राज ठाकरे म्हणाले की, “जर मशिदींमध्ये जर मौलमी असे फतवे काढत असतील, तर राज ठाकरे आज फतवा काढतोय... माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुरलीधर मोहोळ असोत किंवा शिंदेंचे अजित पवारांचे जे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतदान करा.”

नरेंद्र मोदी सरकारबद्दल माझे काही मतभेद पण...

नरेंद्र मोदी यांच्या सरकारबद्दल माझे काही मतभेद आहेत, ते राहणार, जे चांगलं आहेत त्यांचं अभिनंदनही करणार, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच राम मंदिर नरेंद्र मोदींमुळेच होऊ शकलं, असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. जेव्हा राममंदिर झालं तेव्हा कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल, असंही राज ठाकरे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in