पनवेल : राज्यातील मुख्यमंत्री मुलांना हिंदी शिकवण्याचा विचार करतात, मात्र परप्रांतीयांना मराठी शिकवण्याची जबाबदारी घेण्याची मुख्यमंत्र्यांना गरज वाटत नाही. रायगड जिल्हा राज्यातील सर्वाधिक जमीन विक्री होणारा जिल्हा आहे. येथील शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांकडे जात आहेत आणि त्या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या प्रकल्पांमध्ये स्थानिक मराठी तरुणांना काम मिळत नाही, हे दुर्दैव आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले.
शेतकरी कामगार पक्षाच्या ७८व्या वर्धापन दिनानिमित्त रायगडमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्याला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले की, "तुमच्या जमिनी गेल्या की, तुमची संस्कृती संपते, तुमची भाषा संपते. त्यामुळे रायगडमधील शेतकऱ्यांनी आपली जमीन वाचवली पाहिजे. रायगडमधील शेतकऱ्यांच्या जमिनी कुठे जात आहे, याचा विचार शेतकरी कामगार पक्षाने केला पाहिजे. उत्तर भारतातील अनेकांनी महाराष्ट्रातल्या, कोकणातील जमिनी विकत घेतल्यात आहेत. यापुढे उद्योगांसाठी तुमच्या जमिनी विकत घेण्यासाठी कोणी आले तर नुसत्या जमिनी विकत द्यायच्या नाही. तर तुमच्या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या उद्योगांमध्ये भागीदारी मागायची. तुमच्या मुलांनाही तिथेच नोकरी मिळाली पाहिजे आणि उद्योगातही तुमची भागिदारी पाहिजे. अन्यथा येथे अमराठी आमदार, खासदार, नगरसेवक निवडून येतील," असा धोक्याचा इशारा राज ठाकरे यांनी मराठी माणसाला या निमित्ताने दिला.
सर्वाधिक डान्सबार रायगडमध्ये
रायगड जिल्ह्यातील डान्सबारच्या मुद्द्यावरही राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. "छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडात डान्सबार चालतात, हे लज्जास्पद आहे. सर्वाधिक डान्सबार हे रायगड जिल्ह्यामध्ये? डान्सबार बंद झाले होते ना? मग शिवरायांच्या राजधानीत अनधिकृतरीत्या एवढे डान्सबार कसे? तेही कोणाचे, तर अमराठी लोकांचे?" अशा शब्दांत त्यांनी प्रश्नांचा भडीमार केला.