मराठीचा मुद्दा पेटणार! राज ठाकरेंची तोफ मीरा-भाईंदरमध्ये धडाडणार; १८ जुलैला सभा

आता खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुढील शुक्रवारी मीरा-भाईंदरमध्ये धडाडणार आहे. मनसेची ही आभार सभा असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे नेमके काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज ठाकरे
राज ठाकरेसंग्रहित छायाचित्र
Published on

मीरा-भाईंदर : गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच, मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यावसायिकाला केलेल्या मारहाणीचे पडसादही नुकतेच उमटले होते. अमराठी व्यावसायिकांनी काढलेल्या मोर्चाला परवानगी दिली असतानाच, मंगळवारी मनसेने काढलेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, मात्र तरीही मराठीजनांनी हा मोर्चा यशस्वी करून दाखवला. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे १८ जुलै रोजी मीरा-भाईंदरमध्ये सभा घेणार आहेत.

मीरा-भाईंदर येथील अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी ८ जुलै रोजी मनसे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने मोर्चा काढला होता. यावेळी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मध्यरात्रीपासून मनसेच्या नेत्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली होती. यानंतरही मोर्चास्थळी अनेक लोक जमत गेल्याने तातडीने मोर्चाला परवानगी देण्यात आली. आता खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुढील शुक्रवारी मीरा-भाईंदरमध्ये धडाडणार आहे. मनसेची ही आभार सभा असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे नेमके काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द केल्यावर वरळीतील विजयी सभेनंतर जल्लोष करताना मनसे कार्यकर्त्यांनी मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्याला मारहाण केली होती. त्यावर मीरा रोड येथील व्यापाऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्याला पाठिंबा देण्यासाठी बंद पुकारत मोठा मोर्चादेखील काढला. या मोर्चामुळे हिंदी आणि मराठी भाषिक असा वाद पुन्हा पेटला. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मनसे, शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्याकडून एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय झाला. पण या मोर्चाला पोलिसांनी मज्जाव केला. विशेष म्हणजे संभाव्य परिस्थितीचा धोका लक्षात घेता, पोलिसांनी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना मोर्चाच्या एक दिवस आधी मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मोर्चा सुरू होताच आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली. याचे तीव्र पडसाद मुंबईसह राज्यभरात उमटले. बालाजी हॉटेलपासून मीरा रोड रेल्वे स्थानकापर्यंत हा मोर्चा निघाला. यामध्ये हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी सहभागी झाले होते.

आता शुक्रवार, १८ जुलै रोजी राज ठाकरे हे मीरा-भाईंदर मध्ये येणार असल्याची माहिती अविनाश जाधव यांनी आपल्या समाज माध्यमांवरून दिली आहे. त्यामुळे मोर्चात झालेला गोंधळ आणि मनसे कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची पोलिसांनी केलेली धरपकड याबाबत राज ठाकरे मीरा-भाईंदरमध्ये कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in